ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहरातील एका ऑटो चालकाकडे पिस्तुल आढळून आले आहे. पोलिसांनी हे पिस्तुल जप्त करीत त्या ऑटो चालकास अटक केली आहे. शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात घातक शस्त्र जप्त करण्याची मोहीम पोलिसांकडून सुरू आहे. पिस्तुलं, तलवार, खंजर हे हत्यारं आरोपींकडून सतत बाळगले जात आहेत. अशाच एका आरोपीला जुना कौठा भागातील मामा चौक येथून पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून गावठी कट्टा अर्थात पिस्तुल जप्त केले आहे. तसेच इतवारा आणि शिवाजीनगर, हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून खंजर आणि तलवार जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड शहरात पाच एप्रिल रोजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पोलिसांनी जवळपास 60 हुन अधिक आरोपींकडून जप्त केला आहे. त्यात गावठी कट्टे, तलवारी आणि खंजर अशा शस्त्रांचा समावेश आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेले पोलीस हवालदार प्रमोद कराळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली जुना कौठा येथील मामा चौक येथे संशयित थांबलेला ज्ञानेश्वर नरहरी पुंड (वय 35) राहणार आदित्य चायनीज समोर जुना कौठा याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा (पिस्तुल) जप्त केला आहे. प्रमोद कराळे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ऑटो चालक ज्ञानेश्वर पुंड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे करीत आहेत.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलीस अंमलदार हबीब चाऊस यांनी अब्दुल रहमानोदिन अब्दुल शफीउद्दीन (वय 22) राहणार मस्तानपुरा नवामोंढा नांदेड याला हैदरबाद ते मालटेकडी रस्त्यावर ताब्यात घेऊन त्याच्याकडून खंजर व तलवार जप्त केली आहे. हबीब चाऊस यांच्या फिर्यादीवरून अब्दुल रहमानोउद्दीन याच्याविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हा शाखेचे जसवंतसिंग साहू यांनी हर्षनगर भागात आशिष थोरात (वय 22) राहणार कोंढा तालुका अर्धापूर हल्ली मुक्काम हर्षनगर या युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चाकू जप्त केला आहे. जसवंतसिंग साहु यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यातही तीन आरोपीकडून घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. नांदेड पोलीस वेगवेगळ्या मोहिमेदरम्यान गुन्हेगारांची कसून चौकशी करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻