ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहरातील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयासमोर गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्त्या महिलेकडून शैक्षणिक संस्थेला ३० लाख रुपये डोनेशन देतो म्हणून ८ लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून काही रक्कमही वसूल करण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आठ लाख रुपये घेवुन तीस लाख रुपये डोनेशन देतो म्हणुन फसवणुक करणाऱ्या आरोपीतांना उदगीर, जिल्हा लातूर येथून रोख मुद्देमालासह नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनंदा महेंद्र रामटेके वय ५० वर्ष, व्यवसाय सामाजिक कार्य, रा. मनोहर कॉलनी जवळ दिनदयाल वार्ड, रामनगर, ता. जि. गोंदिया ह्या दिनांक २६ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास शंकरराव चव्हाण शासकीय दवाखाना विष्णुपुरी समोरील रोडवर आल्या₹ याठिकाणी अशोक पाटील (हे त्याने स्वतःची ओळख करून दिलेले नाव आहे. खरे नाव तपासात उघड होणार आहे) व त्यांच्या सोबत असलेला एक अनोळखी व्यक्ती यांनी चलनी ५०० रुपये दराच्या १६०० नोटा असे एकुण आठ लाख रुपये घेतले. त्याबदल्यात देणगी म्हणून आलेले ३० लाख रुपये देतो असे सांगून एक मोठे बंडल त्यावर वरील बाजुस ५०० रुपये दराच्या चार नोटा सेलो टेपने चिकटवून त्यावर रबरी बटन लावून त्याखाली उभ्या ४० वह्या ठेवून खाकी रंगाचे सेलो टेपने चहुबाजुने चिटकावून पॅकींग करून ते ३० लाख रुपये आहेत असे भासवून सुनंदा रामटेके यांना फसविले. यावरून फिर्यादी महिलेने नांदेड ग्रामीण ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कलम ४२०, ३४ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयांत पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा डॉ. सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, मदतनीस गटलेवार यांना योग्य मार्गदर्शन करुन सदर गुन्ह्यांतील आरोपीतांचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या.
पोउपनि. महेश कोरे व मदतनीस पोना सुनिल गटलेवार यांचे पथक तयार करुन विष्णुपुरी शासकीय रुग्णालय ते वजिराबाद चौक आदी ठिकाणाचे सी.सी..टी. व्ही कॅमेरे पोलिसांनी चेक केले. सायबर सेल नांदेड येथील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांचे तांत्रीक साह्य घेवून अज्ञात आरोपी हा एका मयत व्यक्तीच्या नावे असणारे सिमकार्ड वापरत असल्याची माहिती यावेळी पोलिसांना मिळुन आली. यावरून आरोपीने कोणाकोणाशी संभाषण केले, याची माहीती घेवून आरोपीचा ठावठिकाणा उदगीर असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. आरोपींनी नगदी रकमेची विल्हेवाट लावु नये म्हणुन तपासी अधिकारी पोउपनि. महेश कोरे, पोउपनि. विजय पाटील, पोना गटलेवार यांच्या टीमने आरोपीतांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन गुन्ह्यांतील नगदी रुपये पाच लाख व गुन्ह्यांत वापरलेली स्कुटी, मोबाईल असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या तपासाबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा डॉ. सिध्देश्वर भोरे यांनी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, तपास अधिकारी पोउपनि. महेश कोरे, पोउपनि विजय पाटील, गटलेवार यांचे विशेष कौतुक केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻