ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ आयपीएस अर्चित चांडक यांची धडाकेबाज कारवाई
नांदेड/बिलोली- बिलोली आणि देगलूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्यानंतर बिलोली उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ३८ वाळू भरलेले ट्रक आणि पाच जेसीबी मशीन जप्त करून बिलोली पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या कांही दिवसांपुर्वीच बिलोली तालुक्यातील येसगीच्या रेती घाटावरील एका जेसीबी मशीनवर कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर पुन्हा बिलोली उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अधिकारी अर्चीत चांडक यांनी दि.१५ मेच्या पहाटे सगरोळीच्या रेती घाटावर छापेमारी करत रेतीने भरलेल्या तब्बल ३८ अवजड वाहनांसह रेती भरत असलेले पाच जे.सी.बी यंञावर कारवाई केली. शहाजी उमाप, अमोघ गावकर, नुरुल हसन यांच्यानंतर अर्चित चांडक यांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या दोन महिन्यांपासून बिलोली तालुक्यातील सगरोळी, येसगी, बोळेगाव, हुनगुदा, माचनुर, गंजगाव येथील तब्बल १० ते १५ रेती घाट सुरू आहेत. हे घाट चालवत असताना ठेकेदाराकडून शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींना पायदळी तुडवून स्थानिक महसुल व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने मांजरा नदीत बेसुमार रेती उत्खननाचा नंगा नाच चालला होता. अशात देगलुर येथील सहाय्यक जिल्हाधिकारी सोमय्या शर्मा यांनी बोळेगाव घाटाच्या आठ वाहनांवर देगलुरमध्ये कारवाई करुन मोठा दंड ठोठावला होता. देगलुर येथील कारवाईमुळे ठेकेदार परेशान असतानाच आयपीएस अधिकारी अर्चीत चांडक यांनी कांही दिवसांपुर्वीच थेट येसगी घाटावरून एक जेसीबी ताब्यात घेऊन कारवाई केली होती. चांडक यांच्या कारवाईने ठेकेदारांनी काही दिवस घाट बंद ठेवले होते. काही दिवसांसाठी बंद असलेले घाट गत दोन- चार दिवसांपासून ठेकेदारांनी पुन्हा सुरू करून जेसीबी यंञाच्या साह्याने उपसा सुरू केला होता. दोन दिवसांपासून रेती ठेकेदारांचा धंदा सुरळीत सुरू असतानाच १५ मे पहाटेच्या सुमारास बिलोली तालुक्यातील सगरोळी रेती घाटावर अचानक छापेमारी करत रेतीने भरलेल्या ३८ अवजड वाहनांसह पाच जेसीबी यंञ व पाच रिकाम्या वाहनांवर कारवाई केली.
रेती घाटावर छापा पडताच अनेक वाहन चालकांनी वाहने जाग्यावरच सोडून पळ काढल्याचे कळते. एकंदर चांडक यांनी केलेल्या या कारवाईमुळे रेती ठेकेदारांना मोठा धक्का बसला असून चांडक यांच्या कारवाईनंतर इतर काही ठेकेदारांनी आपले रेती घाट बंद ठेवल्याचे समजते. या कारवाईत बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे व अन्य अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻