ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– देशसेवेचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरविलेल्या नांदेड जिल्ह्यातील युवकाचा गोदावरी नदीवरील काळेश्वर येथील जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सैन्यात भरती होऊनही या युवकाचे देशसेवेचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
वाळकी खुर्द (ता. लोहा) येथील सैन्यात भरती झालेल्या एका युवकाचा काळेश्वर येथील जलाशयात पोहताना बुडून मृत्यू झाला. ही काल दुपारी 2.30 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ऐन उमेदीत देश सेवा करण्याच्या उद्देशाने परिश्रम घेऊन सैन्यात भरती झालेल्या युवकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाळकी ता. लोहा येथील संतोष पंडित कदम (वय 21 वर्ष) सैन्यात भरती झाला होता. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आपल्या मित्रांसोबत नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात आला होता. ही तपासणी करून झाल्यानंतर तो काळेश्वर येथील काळेश्वर येथील गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेला. मात्र पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने आणि त्यातच त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडून मरण पावला.
युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती सुरेश शंकर कदम यांनी सिडको ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जीवरक्षक दलाच्या मदतीने संतोषचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. तपासणीनंतर पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
वाळकी ता.लोहा येथील स्मशानभूमीत संतोष पंडित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने त्याचे आई-वडील अंथरुणाला खिळले असून कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गावात त्याच्या मृत्यूची वार्ता समजल्यानंतर पूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
संतोष कदमने देशसेवा करण्याचा संकल्प उराशी बाळगून मोठ्या परिश्रमाने सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण घेत सैन्यात प्रवेश मिळविला होता. त्याच्या मेडिकलची प्रक्रिया फक्त बाकी होती, ही मेडिकल प्रक्रिया झाल्यानंतर तो रुजू होणार होता. मात्र त्यापूर्वीच नियतीने त्याच्यावर घाला घातला. लहानपणापासून तो सैन्यात भरती होण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे उत्सुक होता.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻