ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ भोकर तालुक्यातील नांदा येथील घटना
नांदेड– जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील सरपंच महिलेसह त्यांच्या शिक्षक पतीला अटक करण्यात आली आहे. शासकीय कामाचे थकीत बिल अदा करण्यासाठी पैशाची मागणी करून ती लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
भोकर तालुक्यातील नांदा (पट्टी म्हैसा) येथे कंत्राटदाराने केलेल्या कामाचे थकित बिल देण्यासाठी महिला सरपंच आणि तिचे शिक्षक पती या दोघांनी एक लाख ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता ५० हजार रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.
यासंबंधीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला गुरुवार दि. नऊ जून रोजी मिळाली. विभागाने याची १० जून रोजी पडताळणी केली. यात मौजे नांदा (पट्टी म्हैसा) (ता. भोकर, जि. नांदेड ) येथील सरपंच सविता आबन्ना दायलवाड, (वय ३१) व त्यांचे पती जिल्हा परिषद शिक्षक आबन्ना विट्ठल दायलवाड (वय ३८)( बेलपाडा, ता. शहापूर, जि. ठाणे रा. ह. मु. फ्लॅट क्र. २०१, बिल्डिंग क्र. ०३, एलोट्री अपार्टमेंट, शहापूर, जि. ठाणे मूळ रा. नांदा (पट्टी म्हैसा), ता. भोकर, जि. नांदेड ) या दोघांनी तक्रारदार यांनी केलेल्या शासकीय कामाचे थकीत बिल १३ लाख ४० हजार रुपयाच्या २२ टक्के प्रमाणे दोन लाख ९८ हजार ८०० रुपयांची मागणी केली. यात तडजोडीअंती एक लाख ३० हजार रुपये त्यातील पहिला हप्ता म्हणून शुक्रवारी (ता. ११) ५० हजार रुपये स्विकारले. दोन्ही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीना बकाळ, अश्विनीकुमार महाजन यांच्या पथकाने केली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻