ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ सव्वाआठ लाखाच्या मोहफुलासह सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त; किनवट पोलिसांची कारवाई
नांदेड– जिल्ह्यातील किनवट ते बोधडी रस्त्यावर टिंगणवाडी आश्रम शाळेसमोर विनापरवानगी सव्वाआठ लाख रुपयांच्या मोहफुलांचा साठा किनवट पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी यावेळी मोहफुलांची वाहतूक करणारा तेलंगणातील ट्रकही जप्त केला आहे. ही कारवाई दि.16 जून रोजी रात्री बाराच्या सुमारास आश्रम शाळेसमोर करण्यात आली.
किनवट हा आदिवासीबहुल तालुका आहे. विशेष म्हणजे आदिवासी समाजाला या भागांमध्ये पेसा कायद्या अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो. परंतु या भागात बऱ्यापैकी जंगलात राहणारे काही जण मोहफुलं जमा करून त्यापासून हातभट्टी दारू तयार करून विक्री करतात. हा पारंपरिक व्यवसाय असल्याचे सांगत याचे काहीजण समर्थनही करतात, परंतु ते पूर्णतः बेकायदेशीर आहे.
पेसा कायद्या अंतर्गत स्वतः आदिवासी समाजातील नसतानाही मोहफुले खरेदी- विक्री करण्याचा इतरांना अधिकार नाही. तरीही अशाचप्रकारे विनापरवानगी बेकायदेशीररित्या जवळपास 08 लाख 27 हजार 197 रुपयाचे 31 हजार 215 किलो वजनाचे मोह फुले साठा एका ट्रकमधुन घेऊन जाण्यात येत होता. पोलिसांनी हा साठा जप्त केला असून तेलंगणातील नऊ लाख रुपये किंमतीचा ट्रक (टीएस 16-बीयु- 5345) जप्त केला आहे.
ही बेकायदेशीर वाहतूक करणारे चालक शेख मोहम्मद रफीक करीम (वय 32), संभाजी वागोबा नवघडे (रा. गोपाळचावडी, कलंबर) आणि विजय बाबू चव्हाण (राहणार कंचली, तालुका किनवट) अशा तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांना माहिती देऊन फौजदार मिथुन सावंत यांच्या पथकाकडून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फौजदार मिथुन सावंत यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻