ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– अर्धापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील शेकडो केळीच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याची घटना घडली आहे. हाताशी आलेली ही केळीची शेकडो झाडांची बाग कत्तीने तोडण्यात आली आहे. या संतापजनक घटनेत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील केळीची बाग अज्ञात व्यक्तींनी तोडून नष्ट केली आहे. येत्या पंधरा दिवसात पाडण्यासाठी आलेली ही केळीची बाग घडापासूनच कत्तीने तोडून जवळपास 600 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. आज केळीचा भाव जवळपास दोन ते अडीच हजार यादरम्यान असून संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आली आहे.
हा प्रकार कळताच संबंधित शेतकरी आपल्या गावातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन शेतावर गेले. तिथे केळीची बाग अक्षरशः सपाट करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना शोधून काढून त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यापूर्वीही या याच शेतातील एका शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावण्यात आली होती.
मालेगाव ता. अर्धापूर जिल्हा नांदेड येथील चंद्रकांत मुकुंदराव कामेवार आणि बाबुराव राजेवार यांच्या शेतातील दोन हजार केळीपैकी अंदाजे 600 केळीची झाडे रात्री अज्ञात इसमांनी कत्तीने तोडून टाकली. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याच शेतातील रामु सदाशिव राजेवार यांची सोयाबीनची गंजी गतवर्षी जाळून टाकली होती. या शेतकऱ्यावर असलेल्या कोणत्यातरी वादातून किंवा रागातून हा संतापजनक प्रकार केला गेला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻