ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ अतिवृष्टीग्रस्तांना शंभर टक्के मदत मिळवून देणार- खा. चिखलीकर
नांदेड: राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईसह राज्यभरात अनेकांची राजकीय साथीदार आता बदलले आहेत. हाच बदल आज नांदेडमध्येही पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे आज खा.चिखलीकर यांच्यासमवेत पूरग्रस्त भागात दौरे करताना पहावयास मिळाले. अडीच वर्षे एकमेकांसोबत येणे टाळणारे नेते एकत्र आल्याचे बदललेले चित्र कार्यकर्ते आणि इतर नागरिकही कुतूहलाने पाहत होते.
या दौऱ्यात नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे आणि घरांचे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्तांना शंभर टक्के आर्थिक मदत मिळवून देऊ असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पूरग्रस्तांना दिला. जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर हेही यावेळी उपस्थित होते.
मागील तीन दिवसात नांदेड तालुक्यासह अर्धापूर व अन्य भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आसना नदीसह अनेक नदी व नाल्यांना पूर आला होता. या पुराच्या पाण्यात शेकडो हेक्टर वरील पिके खरडून गेली तर हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली आहेत. याशिवाय अनेक गावातील घरांची मोठी पडझड झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना आधार देत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज नांदेड तालुक्यातील एकदरा, निळा ,आलेगाव या तीन गावांना तर अर्धापूर तालुक्यातील शेळगाव आणि बामणी या पूरग्रस्त भागाला भेट दिल्या . पूरग्रस्त भागाला भेट देत असतानाच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. पूरग्रस्तांनी खचून न जाता धीर धरावा राज्य आणि केंद्र सरकार निश्चितपणे आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिला. शिवाय नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करावेत, पंचनाम्याचा अहवाल शासनाला त्वरित पाठवावा असे निर्देशही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणाला दिले.
आसना नदीच्या परिसरातील निळा, एकदरा, आलेगाव व अर्धापूर तालुक्यातील शेलगाव व बामणी परिसरात पावसाच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात आज खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याच्या व घर पिढीतांना तात्काळ अन्नधान्य पुरविण्याच्या सूचना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
यावेळी आ.बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे, नांदेड तहसीलचे तहसीलदार किरण आंबेकर, अर्धापूर तहसीलच्या सौ.पांगरकर, नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरमिटवार सार्वजनिक बांधकाम अर्धापूरचे उप अभियंता विशाल चोपरे, लिंबगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आगलावे, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, प्रतापराव पावडे, बालाजीराव शिंदे कासारखेडकर, बंडू पावडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अडवोकेट किशोर देशमुख, बालाजीराव सूर्यवंशी तळणीकर, डॉ.लक्ष्मणराव इंगोले, अशोक बुटले, बाबुराव हेंद्रे, बाबुराव पाटील कासारखेडकर, विराज देशमुख, कृष्णा देशमुख, सुनील राणे, आनंद पावडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
गेल्या अडीच वर्षांच्या काळात आमदार कल्याणकर हे तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांसमवेत दौरे करताना दिसायचे. आता बदललेल्या राजकीय समीकरणानुसार ते खासदार चिखलीकर यांच्यासमवेत दिसत आहेत. हे बदललेले चित्र सध्या तरी कुतूहलाचा विषय झालेले आहेत.
तिकडे डी. पी. सावंत यांनीही केली पाहणी
दुसरीकडे आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनीही विविध पूरग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली. पासदगाव, चिखली, भालकी, नांदुसा या भागातील अतिवृष्टीची पाहणी माजी डी. पी. सावंत यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्ष निलेश पावडे, माजी पंचायत समिती माजी सभापती सुखदेव जाधव, राजेश पावडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल पावडे, सरपंच केशव अन्नपूर्णे, उपसरपंच प्रभाकर जाधव, बाबुराव जाधव, डूभाजी पाटील आरसुळे, ज्ञानेश्वर पोटजाळे, यांच्यासह या भागातील शेतकरी, नागरिक उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻