ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने पुन्हा एकदा नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गोदावरी नदी पात्रही भरून वाहत असून या पात्रात रविवारी वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आज मंगळवार दिनांक 26 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सापडला. त्याच्यावर शोकाकुल वातावरणात आमदुरा (तालुका मुदखेड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हा युवक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असायचा.
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात असलेल्या आमदुरा येथील युवक अंकुश आनंदराव पवार (वय 21) हा टेन्टचा व्यवसाय करीत असे. रविवार दि. 24 जूलै रोजी तो गोदावरी नदीपात्रात चारच्या सुमारास वाहून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नाही. मुदखेडचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्यासह गावातील अनेकांनी त्याचा शोध सुरू ठेवला.
अखेर आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह आमदुरा पासून काही अंतरावर तरंगताना आढळला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर आमदुरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तो सामाजिक आणि धार्मिक कामात नेहमी पुढे असायचा. त्याच्या अंत्यविधीस अनेकांची उपस्थिती होती. त्याच्या पक्षात तीन भाऊ, आई- वडील असा परिवार आहे. मुदखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻