ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा निराधार- अशोक चव्हाण
नांदेड- राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियातून होत आहे. मी भाजपमध्ये जाण्याचा कोणताही निर्णय घेतला नसून याबाबत होणाऱ्या चर्चा निराधार असल्याचे खुद्द अशोक चव्हाण यांनी आज येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. विशेष म्हणजे नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वी बहुमत चाचणीला अशोक चव्हाण आणि त्यांचे काही आमदार उशिरा विधिमंडळात पोहोचले होते. त्यानंतर पक्षाने त्यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावली. तेव्हापासून अशोक चव्हाण नाराज असल्याच्या चर्चाही सोशल मीडियातून होत आहेत. एवढेच नाही तर मागील दोन दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपात जाणार, अशोक चव्हाण भाजपात आल्यास त्यांचा सत्कारच करू अशी भावना नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केल्या. याला आ. अशोक चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे.
अशोक चव्हाण यांनी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मी काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
येत्या काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असून राज्यात सत्ता बदल झालेला आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्येच राहून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. चर्चा करणाऱ्यांना रान मोकळे पडल्याने ते कुठल्याही विषयाला घेऊन चर्चा करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार, सभापती किशोर स्वामी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻