ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- जिल्ह्यातील शेतकर्यांचे अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्यांना सरसकट एकरी 50 हजार रूपयांचे अनुदान राज्य सरकारने द्यावे, नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्यावतीने आज दि. 12 ऑगस्ट रोजी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकर्यांना तात्काळ मदत करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दि. 12 ऑगस्ट रोजी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या बैलगाडी मोर्चाची सुरूवात नवीन मोंढा भागातून करण्यात आली. तेथून हा बैलगाडी मोर्चा आयटीआय, शिवाजीनगर, वजिराबाद चौरस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
यावेळी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने सत्तेचा खेळ बंद करून शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अन्यथा त्याचा गंभीर परिणाम सरकारला भोगावा लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील म्हणाले की, मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच नांदेड जिल्ह्यात शेतीचे नुकसान होऊन संपूर्ण पिके वाया गेली आहेत. त्यातून उत्पन्न मिळणे अवघड झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. सत्तेचा खेळ सध्या सरकारने बंद करून दुष्काळात अडकलेल्या शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, हेक्टरी 50 हजार ते 1 लाख रूपयांपर्यंत मदत सरकारने दिलीच पाहिजे, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशाराही नानासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी दिला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिले.
हा बैलगाडी मोर्चा यशस्वी करण्यासाठी शंकर बोरगावकर, गुलाबराव जाधव, नितीन गिरडे, गणेश कपाटे, सत्तार पठाण, सचिन कंकाळ, स्वप्नील पाटील, खंडू सावळे, प्रताप पाटील, राजू जाधव, शिवराज कदम, संभाजी ताडेकर, तानाजी पाटील, राजू लिंबटकर, तुकाराम येवले, ऋषीकेश पवार, बाबाभाई सुर्यवंशी, परमेश्वर सावळे, अविनाश कदम, रत्नाकर हंबर्डे, बालाजी सवराले, गिरीधर शिंदे आदी जणांनी परिश्रम घेतले.
या बैलगाडी मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे पाटील, माधवराव ताटे, मराठवाडा अध्यक्ष संतोषअण्णा जेधे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जालना जिल्हाध्यक्ष देवकरण वाघ, राधेश्याम पवळ, किरण काळे यांच्यासह आदी जणांची उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻