ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर: भाजपचे माजी आमदार तथा शेतकरी नेते पाशा पटेल यांचे पुत्र ॲड. हसन पाशा पटेल यांचे आज शुक्रवार २६ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे चार वाजता निधन झाले. ते ३७ वर्षांचे होते. त्यांच्यावर औसा तालुक्यातील लोदगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
ॲड. हसन पटेल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांना हृदय विकाराचा त्रास होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली आणि यातच शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
अतिशय मितभाषी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व असलेले ॲड. हसन पटेल यांनी लातूरच्या दयानंद विधी महाविद्यालयातून कायद्याचे धडे घेतले. पुढे उच्च शिक्षण लंडनमधून घेत त्यांनी एलएलएम पूर्ण केले. गेली अनेक वर्षे ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत होते. त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर अल्पावधीतच कमी वयातील एक निष्णात विधिज्ञ म्हणून आपले स्थान निर्माण केले होते. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात वडील भाजप नेते पाशा पटेल, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.
ॲड. हसन पटेल यांच्या दफनविधीस माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, काँग्रेसचे अभय साळुंके, शिवसेनेचे संतोष सोमवंशी, नांदेडचे गुणवंत पाटील हंगरगेकर, जि. प.चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, वसंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, देविदास काळे, नगरसेवक सचिन बंडापल्ले, इसरार सगरे,ॲड. सुहास बेद्रे, ॲड. गणेश गोमचाळे, सुपर्ण जगताप, मोहसीन खान, अतिष चिकटे, डी. एन.शेळके, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, संतोष बेंबडे, सुहास पाचपुते, विक्रम कदम, पत्रकार राम जेवरे, रामेश्वर बद्दर, हरी तुगावकर, शशिकांत पाटील, हरून सय्यद, अशोक चिंचोले, रघुनाथ बनसोडे, सिकंदर पटेल, चांद पटेल, नवनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील, विविध संघटनांसह, सर्व धर्मियातील प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक, मित्र परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻