Friday, November 22, 2024

नांदेडला मिळणारी एक आमदारकी हुकली; राज्यपालांनी 12 जणांची ‘ती’ यादी केली रद्द

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ 12 जणांच्या यादीत नांदेडचे प्रा. यशपाल भिंगे यांच्याही नावाचा होता समावेश

मुंबई/ नांदेड- सत्ता गमावल्यानंतर आता महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पाठवण्यात आलेल्या १२ नावांची यादी रद्द केली आहे. राजभवनातून पूर्वीची ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठविण्यात आली आहे. या यादीत नांदेडचे प्राध्यापक यशपाल भिंगे यांचेही नाव होते. मात्र आता ही यादीच रद्द झाल्याने विधानपरिषदेच्या माध्यमातून नांदेडला मिळणार असलेली एक आमदारकी हुकली आहे.

ठाकरे सरकारने पाठविलेल्या यादीला राज्यपालांनी दोन वर्षे मान्यता दिली नव्हती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीला प्रतिसाद देत राज्यपालांनी ठाकरे सरकारची १२ जणांची यादी रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून ही यादी रद्द करण्याची विनंती नुकतीच केली होती. एवढेच नाही तर त्यांच्या सरकारच्या वतीने विधान परिषदेत नामनिर्देशनासाठी नवीन नावांची यादी पाठवण्यात येणार असल्याचे या पत्रात म्हटले होते.

राज्य सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक वर्षानंतर, नोव्हेंबर २०२० मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर नामनिर्देशनासाठी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे २० प्रतिष्ठित व्यक्तींची यादी सादर केली, या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली होती. राज्यपाल कोश्यारी यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित १२ उमेदवारांची घोषणा करणे अपेक्षित होते. मात्र, राज्यपाल कोश्यारी आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संबंध काहीसे तणावाचे असल्याने विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्त्यांबाबतचा निर्णय होऊच शकला नाही.

राज्य मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सदस्यांनी नियुक्त्यांची घोषणा करण्यासाठी राज्यपालांना भेटूनही, राजभवनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नंतर राज्यपालांनी या प्रकरणी लवकरात लवकर निकाल द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. तथापि, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेत पाठवलेली नावे नामनिर्देशित केली नाहीत. आता अखेर ती यादी राज्यपालांकडून रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारने नांदेडचे यशपाल भिंगे यांच्यासह खालील 12 जणांची नावे 12 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपालांकडे दिली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून- एकनाथ खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि प्रा. यशपाल भिंगे, काँग्रेसकडून- रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर तर शिवसेनेकडून– अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर यांचा समावेश होता. या यादीतील रजनी पाटील यांना काँग्रेसने राज्यसभेवर संधी दिली आहे. तर एकनाथ खडसे हे आमदारांमधून झालेल्या विधानपरिषद सदस्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेत गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने यशपाल भिंगे यांना साहित्य क्षेत्रातून संधी दिली होती. यशपाल भिंगे हे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर तर नांदेडमधील मौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. प्रा. यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक नांदेडमधून लढवली होती, यात त्यांनी दीड लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली. यामुळेच त्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागल्याचे बोलले जात होते.

नवीन यादी पाठविली जाणार

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून आधीची यादी रद्द झाल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारचा नवीन १२ सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने नवीन यादी राज्यपालांकडे पाठविली जाईल, अशी माहिती आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!