ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी -आदित्य ठाकरे
नांदेड– काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. या यात्रेत आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत चालले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि सचिन अहिर हेही उपस्थित होते. नांदेडमध्ये काल गुरुवारीच राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर आज आदित्य ठाकरे हेही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.
देशातील धोक्यात आलेले संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी, देशहितासाठी आम्हीही महाविकास आघाडीचा मित्र पक्ष म्हणून भारत जोडो यात्रेत सहभागी झालो आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी नांदेडच्या गुरु गोविंदसिंग विमानतळावर दुपारी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेचे नांदेड- हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर, युवासेना सहसचिव माधव पावडे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातील सरकार हे घटनाबाह्य असून ते अनेक निर्णय रेटाने घेत आहेत. देशातील तपास यंत्रणा भाजपच्या अधिपत्याखाली घटनाबाह्य काम करत आहेत. खासदार संजय राऊत यांची अटकही घटनाबाह्य असल्याचे थेट न्यायालयानेच दाखवून दिले आहे. देशातील संविधान आणि लोकशाही ही धोक्यात आहे. ती वाचविण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली असून या यात्रेला सर्वसामान्य जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकंदरीत देशात आणि राज्यात परिस्थिती लक्षात घेता लोकशाही उरली की नाही असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीतील एक मित्र पक्ष म्हणून शिवसेना मोठ्या ताकदीने भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻