ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहराच्या तारासिंग मार्केट परिसरात एका चार चाकी वाहनासह दुचाकी आणि तीन दुकानांना आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अग्निशामक दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी येथील रहिवासी तथा काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोकसिंह हजारी यांनीही आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.
शहरातील तारासिंग मार्केट परिसरातील जोगिंदरसिंग रामगडीया, बक्षीसिंग जहागीरदार यांच्या घराशेजारी उभ्या असलेल्या एका चार चाकी कारला आणि दुचाकीला रविवारी दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण करत बाजूलाच असलेल्या एका इलेक्ट्रिकल दुकानासह अन्य दोन दुकानांना कवेत घेतले. पाहता पाहता आगीचे लोट आणि धूर या परिसरात दूरवर दिसत होते. यावेळी काँग्रेसचे अशोकसिंह हजारी यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले. तसेच वजिराबाद पोलिसांनाही माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्यासह अन्य पोलिस व अग्निशमन दलाचे जवान आपल्या वाहनासह त्या ठिकाणी पोहोचले. अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
तोपर्यंत कार आणि दुचाकी तसेच इलेक्ट्रिकलचे दुकान जळून खाक झाले होते. अन्य दोन दुकानांना तेवढा आगीचा मारा बसला नाही. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. परंतु या ठिकाणी एका लग्न समारंभामध्ये फटाक्यांची लड लावली व ते फटाके कारच्याखाली असलेल्या कचऱ्यामध्ये पडल्याने त्या कचऱ्याने पेट घेतला असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻