ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- चोरट्यांनी 25 लाख रुपयांहून अधिक रक्कम असलेली अख्खी एटीएम मशीनच पळविल्याची घटना नांदेडच्या भररस्त्यावर घडली आहे.
शहराच्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर भावसार चौक येथील एसबीआय बँकेचे एटीएम कारच्या साह्याने फोडून 25 लाख रुपयांहून अधिक रक्कम लंपास करण्यात आली आहे. ही घटना आज 25 नोव्हेंबरच्या पहाटे दोनच्या सुमारास घडली आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावसार चौक येथे एसबीआय बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मोठी रक्कम जमा केली होती. याच एटीएमला अनोळखी चोरट्यांनी हेरले. कारच्या साह्याने एटीएम मशीन ओढून बाहेर काढली आणि गाडीत टाकून लिंबगाव शिवारात फोडली. यात जवळपास 25 लाख 89 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. हिंगोली, लातूर, परभणी, तेलंगणाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली. चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून त्यांच्या सोबत आणलेल्या कारला वायरने बांधून एटीएम मशीन बाहेर ओढली आणि ही मोठी चोरी करण्यात आली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू असून शहराच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻