ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नांदेडमध्ये धावता दौरा नियोजित होता. ते नांदेड विमानतळ येथे येऊन दाभड, भोकरमार्गे तेलंगणात जाणार होते. पण हा दौरा रद्द करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्याला लागूनच असलेल्या तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित भाजपच्या कार्यक्रमास तेलंगणा पोलिसांनी परवानगी नाकारल्याने फडणवीस यांचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.
संबंधित बातमी 👇🏻
तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात चांगला राजकीय दबदबा असणारे नांदेड येथील उद्योजक रामराव पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम आणि रॅलीचे निर्मल जिल्ह्यात आयोजन करण्यात आले होते. यात देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती राहणार होती. त्यासाठीच्या नियोजित कार्यक्रमानुसार फडणवीस यांचे नांदेड विमानतळ येथे आज सकाळी 11.30 वाजता आगमन होणार होते. नांदेड विमानतळ येथून मोटारीने तेलंगणातील पार्डी (बी) जि. निर्मलकडे ते प्रयाण करणार होते. हा कार्यक्रम आटोपून परत दुपारी 4.30 वाजता नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होणार होते.
हा दौरा कार्यक्रम आल्यानंतर नांदेडसह बारड, भोकर येथील नेते- कार्यकर्त्यांनीही त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली होती. पण हा धावता दौरा रद्द झाला आहे. तेलंगणातील त्यांच्या कार्यक्रमास तेथील पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष प्रवीण साले आणि जिल्हा उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी दिली. पोलिसांनी परवानगी नाकारण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी तेलंगणातील सत्ताधारी टीआरएस आणि भाजपमधील राजकीय संघर्षातून ही परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻