Friday, January 3, 2025

हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सराफा व्यापारी कंचर्लावार यांचा मृत्यू; आरोपींच्या अटकेसाठी व्यापारी आक्रमक; आज किनवट बंदचे आवाहन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अपर पोलीस अधीक्षकांची किनवटला भेट; पोलिसांची जादा कूमक दाखल

किनवट (जि. नांदेड)– जमिनीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सराफा व्यापारी श्रीकांत कंचर्लावार (वय ४५) यांनी १७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर हैदराबादेतील खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर हल्लेखोरांच्या अटकेसाठी व्यापारी संघ आक्रमक झाला असून गुरुवार दि. २९ रोजी किनवट बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

जमिनीच्या वादातून संतोष कोल्हे, विशाल कोल्हे, विक्की कोल्हे व इतरांनी संगनमताने दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी व्यापारी व्यंकटेश उर्फ बंडू कंचर्लावार यांना बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती कळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले बंडू कंचर्लावार यांचे मोठे बंधु सराफा व्यापारी श्रीकांत कंचर्लावार यांनाही वरील आरोपींनी दगड, लाठ्या- काठ्यांनी बेदम मारहाण केली. किनवट शहरातील पैनगंगा नदी परिसरातील जागेच्या वादातून मारहाणीचा हा प्रकार घडला होता. या मारहाणीत कंचर्लावार बंधु गंभीर जखमी झाले. दोघांनाही हैदराबाद येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले होते.

अत्यवस्थ असलेल्या श्रीकांत कंचर्लावार यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. मारहाणीच्या घटनेला १७ दिवस उलटूनही आरोपींना अटक होत नसल्याने स्थानिक आर्य वैश्य समाज व व्यापारी संघाने आक्रमक पवित्रा घेत बुधवार दि. २८ रोजी शहरातील शिवाजी चौकापासून मूकमोर्चा काढून डीवायएसपींना निवेदन दिले. आर्य वैश्य समाजाच्या व्यापार्‍यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून कंचर्लावार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मारहाणीची घटना पोलिसांनी गांभिर्याने घेतली नसल्यानेच आरोपी मोकाट असल्याचा आरोप व्यापार्‍यांनी करीत आरोपींच्या अटकेसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची विनंती करु तसेच साखळी उपोषण करण्याचा इशाराही व्यापार्‍यांनी दिला.

किनवट बंदचे आवाहन मारेकर्‍यांच्या अटकेच्या मागणीसह श्रीकांत कंचर्लावार यांना श्रद्धांजली म्हणून गुरुवारी दि. २९ रोजी किनवट बंदचे आवाहन व्यापारी संघाने केले असून बंद यशस्वी करण्याचे आवाहन विविध व्यापारी संघाने केले आहे. मंत्री मुनगंटीवार यांचे गृहमंत्र्यांना पत्र व्यापारी संघाने उपरोक्त घटनेसंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सविस्तर निवेदन पाठविले होते. निवेदनाची तत्काळ दखल घेत मंत्री मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांना पत्र लिहून पोलीस निरीक्षकांच्या निलंबनासह प्रकरणाची विभागीय चौकशीची मागणी केली आहे. अशा प्रकरणात पोलिसांकडून सत्वर कारवाई होणे अपेक्षित होते, असे पत्रात नमूद करत त्यांनी मारेकर्‍यांच्या अटकेची मागणी केली.

अवयवदानानंतर अंत्यसंस्कार

व्यापारी श्रीकांत कंचर्लावार यांच्या मृत्यूनंतर दवाखाना प्रशासनाने कंचर्लावार कुटुंबियाकडे अवयवदानाचे आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत कंचर्लावार कुटुंबाने बुधवारी दिवंगत श्रीकांत यांचे यकृत, डोळे, किडण्या आदी अवयव दान दिले. श्रीकांत कंचर्लावार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२ वा. किनवटच्या कैलास मोक्षधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, भावजय, बहिणी, पुतणे असा परिवार आहे.

अपर पोलीस अधीक्षकांची किनवटला भेट; पोलिसांची जादा कूमक दाखल
श्रीकांत कंचर्लावार यांच्या निधनानंतर व्यापाऱ्यांनी मारेकऱ्यांच्या अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेत आरोपींना अटक न झाल्यास कंचर्लावार यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री उशिरा भोकरचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. अंबादास धरणे यांनी किनवटला भेट दिली. डीवायएसपी कार्यालयात त्यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मारेकऱ्यांच्या अटकेबरोबरच प्रकरणाची उचित चौकशी होईल, असा विश्वासही त्यांनी शिष्टमंडळाला दिला. दरम्यान, रात्री उशिरा शहरात अतिरिक्त पोलिसांची कूमक दाखल झाली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!