ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पंचविसावा दीक्षान्त समारंभ आणि विशेष दीक्षान्त समारंभ दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या विशेष दीक्षान्त समारंभामध्ये देशाचे रस्ते वाहतूक व महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना ‘डी.लिट’ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या दीक्षान्त समारंभास राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे अध्यक्षपद भूषविणार आहेत. राज्यपालांचा हा पहिलाच कार्यक्रम असणार असून त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची उपस्थित असणार आहे. हा दीक्षान्त समारंभ यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. गठीत समिती प्रमुखांच्या वेळोवेळी बैठका घेवून सूचना व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
पंचविसाव्या दीक्षान्त समारंभासाठी उपस्थित व अनुउपस्थित राहून पदवी घेण्यासाठी एकूण १८ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र सादर केले होते. विद्यापीठ परीनियामाप्रमाणे विद्यापीठ परिसर, परभणी उपपरिसर व हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेज मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र या दीक्षान्त समारंभामध्ये वितरीत करण्यात येणार आहेत. आणि उर्वरित प्रमाणपत्र त्या-त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
या दीक्षान्त समारंभामध्ये एकूण १७३ विद्यार्थ्यांना पीएचडी प्रमाणपत्र देवून पीएचडी पदवी देण्यात येणार आहे. एकूण ५२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतंर्गत २३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देण्यात येणार आहेत. मानव्यविज्ञान विद्याशाखेंतर्गत २० विद्यार्थ्यांना, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेतर्गत आठ विद्यार्थ्यांना तर आंतरविद्याशाखेंतर्गत दोन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहेत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यपाल पदाची शपथ घेतली. राज्यातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ कार्यक्रम हा त्यांच्या राज्यपाल पदाच्या काळातील पहिलाच असणार आहे. या कार्यक्रमाला ते आभासी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. आभासी पद्धतीनेच ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा देतील.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻