ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लोहा (जि. नांदेड)- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काही दिवसांपूर्वीच नांदेड शहरात भव्य जंजिरा सभा घेतली. त्यानंतर आता पुन्हा ते नांदेड जिल्ह्यात येत असून दि. २६ मार्च रोजी ते लोहा येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएस पक्षात प्रवेश करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार धोंडगे यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली असून त्यांनतर लोहा येथील सभेचे नियोजन करण्यात आले आहे. लोहा शहरात के. चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा दि. २६ मार्च रविवार रोजी होणार आहे.
लोहा शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी माजी जि. प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, दत्ता पाटील पवार, शिवराज धर्मापुरीकर, मनोहर पाटील भोसीकर, प्रल्हाद फाजगे, प्रविण जेठेवाड आदीं उपस्थित होते.
शेजारील तेलंगणा राज्यात शेतकरी, शेतमजुर, कामगार, कष्टकरी, व मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी राबविलेल्या विविध धोरणामुळे तेथील ग्रामीण अर्थव्यवस्था आजघडीला भक्कम झाली आहे. महाराष्ट्र राज्यातही तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील समाजाला न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा शेतक-यांना संघटीत करणार असल्याची माहिती यावेळी शेतकरी नेते तथा माजी आ. शंकर अण्णा धोंडगे यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना माजी आ. धोंडगे म्हणाले, शेतक-याच्या हिताचे असलेले तेलंगाना मॉडेल कसे आहे आपल्या भागातील जनतेला माहिती व्हावी त्यानुषंगाने सदर मॉडेलचे जनक भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची दि. २६ मार्च रोजी रविवारी लोहा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सदरील सभेस लोहा-कंधार तालुक्यातील जनतेने बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सभेचे आयोजक माजी आ. शंकर अण्णा धोंडगे यांनी यावेळी केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻