ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नवी दिल्ली – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना शपथ दिली. याप्रसंगी उपसभापती हरिवंश आणि राज्यसभा महासचिव पी. सी. मोदी उपस्थित होते. आज पहिली शपथ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी मराठीत शपथ ग्रहण केली.
शपथग्रहण सोहळ्याला चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण आणि दोन्ही कन्या सुजया चव्हाण व श्रीजया चव्हाण उपस्थित होत्या. शपथविधी सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना खा. अशोक चव्हाण यांनी विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहांचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या उभारणीसाठी मी सर्वोपरी योगदान देण्याचा प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले. राज्यसभेवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षनेतृत्वासह संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त केले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻