Tuesday, January 28, 2025

अखेर 27 जूनपासून नांदेड – पुणे विमानसेवा; नागपूर- नांदेड- पुणे असे उड्डाण होणार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड – अखेर 27 जूनपासून नांदेड – पुणे विमानसेवेला सुरुवात होत आहे. नांदेड शहर देशातील सात शहरांशी विमानसेवेने जोडले गेल्यानंतर आता त्यात आणखी दोन शहरांची भर पडणार असून नागपूर- नांदेड- पुणे अशी विमानसेवा 27 जूनपासून सुरू होणार आहे.

येथील श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावरून देशाच्या विविध भागातील महत्त्वाच्या शहराला नांदेड शहर हे विमानसेवेने जोडण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली बेंगलोर- गाझियाबाद (दिल्ली) आणि हैदराबाद- अहमदाबाद अशी सेवा सुरू आहे. एक जूनपासून नांदेड- हैदराबाद- तिरुपती ही नवी सेवा सुरू झाली आहे. आता 27 जूनपासून नागपूर- नांदेड- पुणे अशी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानंतर आणखीही काही शहरांसाठी नांदेडहून विमानसेवेची सुरुवात होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

नांदेड शहर हे सचखंड गुरुद्वारामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. सचखंडचे दर्शन घेण्यासाठी देश- विदेशातून शीख भाविकांसह अन्य नागरिकही मोठ्या प्रमाणात नांदेडच्या पवित्र भूमीत येत असतात. कोरोना महामारीपूर्वी नांदेडची विमानसेवा बंद पडली होती. परंतु गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने विमानसेवा प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला. आणि अखेर स्टार एअर कंपनीने सर्वे केल्यानंतर विमानसेवा सुरू केली.

बेंगलोर- गाझियाबाद (दिल्ली) आणि हैदराबाद- अहमदाबाद (गुजरात) अशी विमानसेवा सुरू आहे. या सर्व फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने स्टार एयर कंपनीच्या व्यवस्थापनाने एक जूनपासून नांदेड- हैदराबाद- तिरुपती अशी विमानसेवा सुरू केली आहे. नांदेडहून सायंकाळी चार वाजता हैदराबादकडे विमान झेपावत आहे. त्यानंतर हैदराबाद विमानतळावर काही वेळ थांबून तेच विमान पुढे तिरुपतीकडे रवाना होत आहे.

त्यानंतर आता नागपूरहून नांदेड ते पुणे अशी विमानसेवा येत्या 27 जूनपासून सुरू होत आहे. हे विमान सकाळी दहा वाजता नांदेडला पोहोचणार असून त्यानंतर पुण्याकडे रवाना होणार आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर लगेच मुंबई आणि गोवा अशी विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय स्टार एयर कंपनीने घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

विमानसेवेमुळे नांदेडला भाविकांची संख्या वाढली आहे. दररोज ही विमानसेवा सुरू असल्याने दिल्ली, चंदीगड, अमृतसर या भागातील शीख भाविक मोठ्या प्रमाणात शिख धर्माची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडच्या पवित्र भूमीत सचखंडचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. या सर्व भाविकांचे सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने दररोज स्वागत करण्यात येत आहे. विमानसेवेमुळे नांदेडची देशभरातील विविध शहरांशी उत्तम अशी कनेक्टिव्हिटी झाली आहे.

पुणे विमान सेवेमुळे नांदेड आणि पुणे तसेच महाराष्ट्र राज्याची उपराजधानी म्हणून नागपूर या शहराशी आता नांदेड हवाई सेवेने जोडले जात आहे. पुणे हे सांस्कृतिक व शैक्षणिक चळवळीचे माहेरघर असल्याने आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी नांदेड व आजूबाजूच्या जिल्ह्यातून विद्यार्थी वास्तव्यास असल्याने त्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांनाही आता या सेवेचा चांगला लाभ होणार आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!