ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
औरंगाबाद- राज्यातील बहुतांश विद्यापीठांच्या संलग्नित महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी दिलेली अंतिम तारिख संपल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहीले आहेत. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.5) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
आ.सतीश चव्हाण यांनी उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी सध्या अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील असंख्य विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. अभियांत्रिकी शाखेची प्रवेश प्रकिया 16 डिसेंबर 2021 पर्यंत चालणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना सदरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार नाही असे असंख्य विद्यार्थी पदवी विज्ञान व इतर शाखेसाठी प्रवेश घेतात. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने संलग्नित महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी 30 नोव्हेंबर 2021 ही अंतिम तारिख दिली होती. सदरील तारीख संपल्याने अभियांत्रिकी शाखेसाठी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पदवी विज्ञान व इतर शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे असंख्य विद्यार्थी पुढील शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत लक्षात घेता राज्यातील विद्यापीठांना पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी 20 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत वाढ देण्यासाठी संबधितास योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻