Friday, October 18, 2024

जरांगे पाटील उद्या नांदेडमध्ये! शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल; शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती व शांतता रॅलीचे उद्या दिनांक 8 जुलै नांदेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी लाखों मराठा समाजबांधव नांदेड शहरात येण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागाकडून नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. तसेच नांदेड शहरातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीमुळे नांदेड शहरासाठी सर्व माध्यमांच्या शाळांना आठ जूलै रोजी एक दिवसाची सुट्टी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या बाबत काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सूचनेनुसार, शहरातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 8 जुलै रोजी नांदेड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने व गर्दी होणार आहे. त्यामुळे नांदेड शहरातील सर्व रस्ते सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद आहेत. तशी सूचना पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी दिली आहे. सदर सूचनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार नांदेड शहरातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांना दिनांक 8 जुलै रोज सोमवार एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

तसेच याद्वारे कळविण्यात येते की, दिनांक 8 जुलै सुट्टीच्या दिवशीच्या तासिका पाठ्यक्रम पुढील येणाऱ्या लगतच्या दोन अर्धवेळ कार्यदिनाच्या दिवशी पूर्णवेळ शाळा घेऊन सदर सुट्टीच्या दिवशीच्या तासिका पाठ्यक्रम पूर्ण करून घेण्यात येणार आहेत. सदर सुट्टी ही केवळ नांदेड शहरातील शाळांनाच लागू आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

नांदेड जिल्हा स्कूल/बस/व्हॅन असोसिएशन तर्फे बंद जाहीर
मराठा समाजाचा शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहर वाहतुकीच्या मार्गावर बदल केले आहेत. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा स्कूल/बस/व्हॅन असोसिएशन तर्फे आधीच उद्या बंद जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर शालेय विभागाने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला.

याबाबत स्कूल बस असोसिएशनने काढलेल्या पत्शरकात म्हटले होते की, शहरातील वाहतुकीचा बदल लक्षात घेता आणि शहरात उद्या होणाऱ्या मराठा समाज शांतता रॅलीचा विचार करता काही शाळांनी बंद पाळण्याचा निर्णय अधिकृतपणे घेतला नसला तरीही काही शाळा बंद राहतील अशी पालकांना सूचना प्राप्त झाली आहे. या निर्णयाचा विचार करता पालक व विद्यार्थी यांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेड जिल्हा स्कूल बस व्हॅन असोसिएशन तर्फे उद्या जाहीर बंद ठेवण्यात येणार आहे.

ज्या पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत सोडवयाचे असेल त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याची व्यवस्था करावी,असे आवाहन नांदेड जिल्हा स्कूल बस व्हॅन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी आधीच केले होते.

११ वाजता होणार रॅली सुरुवात

सगे सोयरे कायदा अंमलात आणुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे, महाराष्ट्रातील आत्तापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या दि. ८ जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली निघणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली ही शहरात दि. ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राज कॉर्नर तरोडेकर चौक, राजमाता जिजाऊ चौक, श्रीनगर, महात्मा ज्योतिबा ङ्गुले व सावित्रीबाई ङ्गुले पुतळा आयटीआयचौक, शिवाजीनगर, एस.पी. ऑङ्गीस चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर या मार्गाने निघार आहे.

सदर रॅलीचे नेतृत्व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करणार असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून ते संवाद साधणार आहेत. मागील पंधरा दिवसांपासून सदरील रॅलीच्या नियोजनासाठी अखंड मराठा समाज नांदेड जिल्हा व जिल्हा नियोजन समिती यांच्याकडून रॅलीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. दि. २० जून २०२४ रोजी अखंड मराठा समाज नांदेड जिल्ह्याची एक सामुहिक बैठक पार पडली. सदरील बैठकीत अनेक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. या बैठकीत जिल्हा बैठक, तालुका बैठक, गावागावातील बैठक घेऊन जनजागृती करण्याचे काम समाज बांधवांनी हाती घेतले. तसेच रॅलीच्या नियोजनासाठी लागणारे सर्व साधणांची जबाबदारी सुद्धा वाटून देण्यात आली.

जिल्हाभरातील सर्व तालुक्यातील, गावागावातील समाज बांधवांना लाखोंच्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. गाव, खेड्यातून, तालुक्यातुन येणार्‍या सर्व समाज बांधवांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नवा मोंढा मैदान, शासकीय तंत्र निकेतन, कॅनॉल रोड, नागार्जुन पब्लिक स्कुल या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, तसेच रॅली निघणार्‍या मार्गात जागोजागी खिचडी वाटप, रॅलीच्या समारोपाच्या ठिकाणी योग्य अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था, जरांगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये अंतरवाली सराटीपासून येणार्‍या पाहुण्यांची मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था, मुक्कामाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, रॅली मार्गात जागोजागी सत्कार समारंभ असे सर्व नियोजन जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत करण्यात आले आहे.

प्रशिक्षित मराठा स्वयंसेवकांची एक मोठी फळी सुद्धा तयार करण्यात आली आहे. मराठा सेवकांना लागणारी साधन सामुग्री जसे की, टी-शर्ट, गळ्यामध्ये आयडी कार्ड आणि संपुर्ण रॅलीला कव्हर करण्यासाठी शंभर वाकी टॉकीची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!