ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

• खासदार अशोकराव चव्हाण यांची माहिती
नांदेड (प्रतिनिधी)- मुंबई विमानसेवेसाठी सुरु असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या बहुप्रतिक्षित विमानसेवेसह नांदेड – गोवा विमानसेवा येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे नांदेड – मुंबई विमानसेवेसाठी नवी मुंबई विमानतळाऐवजी मुंबईतील मुख्य विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट देण्याची मागणी देखील मंजूर झाली असल्याची माहिती खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.
या दोन्ही विमानसेवांचे संचालन स्टार एअर ही कंपनी करणार असून, या सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असतील. मुंबई – नांदेड विमान दररोज दुपारी ४.४५ वाजता मुंबईहून उड्डाण करून सायंकाळी ५.५५ वाजता नांदेडच्या श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर उतरेल. त्याच विमानाचे सायंकाळी ६.२५ वाजता उड्डाण होऊन रात्री ७.३५ वाजता ते मुंबई विमानतळावर पोहोचेल. गोव्याच्या मोपा विमानतळावरून नांदेडला येणारे विमान दुपारी १२ वाजता उड्डाण करून १ वाजता उतरेल आणि दुपारी १.३० वाजता उड्डाण करून २.४० वाजता गोव्याला पोहोचेल.
या दोन्ही विमानसेवेमुळे नांदेडसह परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीस्कर हवाई सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः मुंबईसाठी थेट विमानसेवा प्रवाशांना मोठा दिलासा आहे. नांदेडहून गोव्यासाठी विमानसेवा सुरु होणार असल्याने विशेषतः पर्यटकांना त्याचा लाभ मिळेल. नांदेडहून पूर्वी दिल्ली (हिंडन), अहमदाबाद, पुणे, बंगळूरू व हैद्राबाद अशा ५ विमानसेवा सुरु होत्या. मुंबई व गोव्याच्या विमानसेवेमुळे ही संख्या ७ वर गेली आहे. पुढील काळात नांदेडहून थेट तिरूपती, शिर्डी व कोल्हापूरसाठी विमानसेवा सुरु करणे हे आमचे उद्दिष्ट असेल, अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
नांदेड शहराची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन येथील रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीशी संबंधित पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर विविध मागण्या मांडल्या असून, त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. नांदेडहून मुंबई व गोव्यासाठी सुरू होणारी विमानसेवा हे त्या प्रयत्नांचेच फलित आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आभारी असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻



