Tuesday, December 2, 2025

नांदेड जिल्ह्यातील मुखेड, धर्माबाद नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या; इतर ठिकाणीही काही जागांवरील निवडणूक स्थगित

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

👉🏻 आता २० तारखेला मतदान, २१ ला मतमोजणी; आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर

👉🏻 राज्यातील इतरही काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

मुंबई/ नांदेड (प्रतिनिधी)- मतदानाला ४८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असतानाच राज्यातील अनेक नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रचार आज संपुष्टात येणार होता, पण त्याआधीच काही ठिकाणी नव्याने निवडणुका घेण्यात येत असल्याचे आयोगाकडून जाहीर कऱण्यात आले. यात नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद या नगरपरिषदांचा समावेश आहे. याचबरोबर भोकर येथील प्रभाग १ ब, लोहा येथील प्रभाग ५ ब आणि कुंडलवाडी येथील प्रभाग ३ अ या ठिकाणच्या जागांवरील निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे.

नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात काही उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नांदेड, सोलापूर, पुणे, अमरावती, सांगली, सातारा, धाराशिवसह अनेक जिल्ह्यातील निवडणुका अथवा काही प्रभागातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्याच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. पण आता २०-२१ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

राज्यात या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या:

अमरावती – अंजनगाव सुर्जी (नगरपरिषद निवडणूक)
अकोला – बाळापूर नगरपालिका
अहिल्यानगर – कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी (नगरपरिषद निवडणूक)
सातारा – फलटण , महाबळेश्वर (नगरपरिषद निवडणूक)
पुणे – बारामती, तळेगाव
यवतमाळ – दिग्रस पांढरकवडा, वनी
नांदेड – मुखेड, धर्माबाद
(भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील एका एका जागेवर निवडणूक पुढे ढकली)
सोलापूर – मंगळवेढा
धाराशिव – प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब
जालना – भोकरदन 1 अ आणि प्रभाग 9 ब
चंद्रपूर – घुग्गुस
गोंदिया – वॉर्ड क्रमांक 3, 11 आणि 16

सुधारित निवडणूक कार्यक्रम :

४ डिसेंबर: जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
१० डिसेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत): नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम मुदत.
११ डिसेंबर: चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर.
२० डिसेंबर: मतदान.
२१ डिसेंबर २०२५: मतमोजणी.
२३ डिसेंबरपूर्वी: संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण.

जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते. परंतु अपीलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून दि.२२ नोव्हेंबर २०२५ नंतर म्हणजेच दि.२३ नोव्हेंबर २०२५ किंवा त्यानंतर देण्यात आलेला आहे, अशा नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणूका ०४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येवू नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!