Wednesday, December 3, 2025

बोगस IAS कल्पना भागवतने खासदार आष्टीकर यांनाही घातला गंडा; महिलेचे पाकिस्तान अफगाणिस्तान कनेक्शनही झाले आहे उघड

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड/ छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- तोतया अर्थात बोगस आयएएस अधिकारी कल्पना भागवत या महिलेने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कनेक्शन पोलीस तपासात उघडकीस आलेले आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे गेल्या सहा महिन्यांपासून राहत असलेल्या तोतया अर्थात बोगस आयएएस अधिकारी कल्पना भागवत या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. कल्पना भागवतच्या अटकेनंतर तिचे धक्कादायक पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कनेक्शन उघडकीस आलं आहे. अशातच आता याप्रकरणात या महिलेने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही फसविल्याची बाब उघडकीस आली आहे.

बोगस आयएएस कल्पना भागवतने खासदार नागेश आष्टीकर यांच्याकडून बनवाबनवी करीत एक लाख ४५ हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिलेच्या खात्यात पैसे देणाऱ्यांच्या ११ जणांच्या यादीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे.

खासदार नागेश पाटील आष्टीकर
याबाबत स्वतः खासदार आष्टीकर यांनीही या महिलेने अडचणीत असल्याची विविध कारणे देत पैशांची मदत करण्याची विनंती केली होती. अडचणीत मदत करण्याच्या हेतूने आपण पैसे दिल्याचे सांगितले. संबंधित महिला एका कार्यकर्त्यामार्फत भेटली तसेच कधी मंदिर बांधायचे, कधी रुग्णालयासाठी पैसे लागत असल्याचे तिने सांगितले म्हणून पैसे दिले. या पलीकडे या महिलेशी फारसा परिचय नसल्याचे खासदार आष्टीकर यांनी सांगितले आहे.

कल्पनाने अफगाणी मित्र अशरफच्या भावाच्या पाकिस्तानातील रेस्टॉरंटसाठी ३ लाख रुपये हवालामार्फत पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे. ही रक्कम तिने आधी अशरफला दिल्लीत पाठवली. तेथून त्याने मित्राच्या मदतीने ती हवालामार्फत पाकिस्तान मध्ये पोहोचवली. आता या सर्व प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.

एका बड्या हॉटेलमध्ये सहा महिन्यांपासून मुक्कामी असणाऱ्या कल्पना भागवत या महिलेस अटक केल्यानंतर तिच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. अफगाणीस्तानातील तिचा प्रियकर तसेच अनेकांनी तिच्या खात्यात पैसे भरल्याचे दिसून आले. पाकिस्तानमधील पारपत्र आणि अफगाण नागरिकाबरोबर सुरू असणाऱ्या संवादामुळे अडचणीत आलेल्या या महिलेच्या आर्थिक व्यवहाराची पोलीस तपासणी सध्या केली जात आहे. यातील या महिलेशी व्यवहार करणारा अशरफ खिल याला व त्याच्या साथीदाराला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

पोलीस कोठडी मागताना दिलेल्या विवरणात ३२ लाख ६८ हजार ८६२ एवढी रक्कम विविध खात्यांतून आल्याचे म्हटले आहे. याशिवाय काही मोठ्या रकमेचे धनादेशही असल्याचे झडतीत आढळून आले होते. यामध्ये बँक ऑफ इंडियाचे धनादेश असून, त्यावर ७ मार्च २०२५ अशी तारीख आहे. हा धनादेश कल्पना भागवत व निखिल भाकरे यांच्या नावे आहे. या शिवाय कॉसमॉस बँकेचा सहा लाख रुपयांचा एक धनादेश आहे.

कल्पना भागवत या महिलेस रक्कम देणाऱ्यांमध्ये अशरफ खिल या अफगाणीस्तानातील व्यक्तीने दोन लाख ३१ हजार रुपये दिले आहेत. शिवाय सुंदर हरी उर्फ सुरेश जैन याने एक लाख ५० हजार, अभिजीत क्षीरसागर याने दीड लाख रुपये, दत्तात्रय शेटे याने सात लाख ८५ हजार, रमेश मुळे याने दोन लाख २५ हजार, सुधाकर जाधव याने एक लाख १८ हजार तर नागेश आष्टीकरकडून एक लाख ४५ हजार रुपये मिळाल्याचे उल्लेख आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!