ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
16 मोबाईल आणि दुचाकी जप्त
नांदेड- शहर व जिल्ह्यात मोबाईल आणि दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 16 मोबाईल आणि दुचाकी जप्त केली.
शहर व जिल्ह्यात दुचाकी आणि मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सूचना दिल्या. यावरून श्री चिखलीकर यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश देऊन या गुन्ह्यातील चोरट्यांना अटक करून त्यांना गजाआड करण्याच्या सूचना दिल्या. यावरून पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांनी आपले सहकारी गंगाधर कदम, बालाजी तेलंग, संजीव जिंकलवाड, रणधीर राजबन्सी, विठ्ठल शेळके आणि बालाजी यादगिरवाड यांना सोबत घेऊन नायगाव तालुक्यात गस्त घातली.
यावेळी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून घुंगराळा तालुका नायगाव येथील साहेबराव शंकरराव ढगे (वय 22) आणि माणिक उर्फ अर्जुन तोलबा ढगे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. यावेळी या दोघांच्या ताब्यातून सोळा मोबाईल ज्यांची किंमत तीस हजार शंभर रुपये आणि वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली एक दुचाकी असा 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही चोरट्यांकडून अजून काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता चिखलीकर यांनी व्यक्त केली. मुद्देमाल व दोन्ही चोरटे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कुंटूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. कुंटूर पोलीस यांना मंगळवारी नायगाव न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे सांगण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻