ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
नांदेड– ED च्या रडारवर असणारा नांदेड महापालिकेचा गुंठेवारी विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. या विभागाच्या लिपिकास आज लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
येथील महापालिकेच्या गुंठेवारी विभागात मार्ग लिपिक असलेल्या गजानन सर्जेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना मंगळवार दि. १३ जून रोजी सायंकाळी रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अगोदरच भ्रष्टाचारामुळे वादात अडकलेला आणि ईडीच्या रडारवर असलेला गुंठेवारी विभाग पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या तक्रारदाराने आपल्या मालकीचा प्लॉट क्रमांक चार गट नंबर 99, तरोडा खुर्द, नांदेड येथे मालमत्तेचे नियमाधीन गुंठेवारी मिळविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2021 मध्ये अर्ज केला होता. परंतु नंतरच्या काळात महापालिकेची गुंठेवारी भ्रष्टाचारात अडकली आणि या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल झाले. एवढेच नव्हे तर हे प्रकरण पोलीस आणि नंतर ईडीपर्यंत पोहोचले.
त्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी शासकीय ठराव घेऊन एक जूनपासून ते 30 जूनपर्यंत गुंठेवारीला मुदतवाढ दिली होती. अनेक प्रकरणे प्रलंबित असताना महापालिकेतील गुंठेवारी विभागातील लाच घेतल्याशिवाय काम होत नाही हेच पुन्हा एकदा गजानन सर्जेस झालेल्या कारवाईवरून पुढे आले आहे. तक्रारदाराने गुंठेवारी विभागाचे मार्ग लिपिक गजानन सर्जेकडे गुंठेवारी फाईल मंजूर करून द्यावी अशी विनंती केली. यावेळी सर्जेने त्याला खर्च करावा लागेल असे कळविले आणि पाच हजार रुपयांची लाच मागितली. परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने आठ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली आणि १३ जून रोजी पडताळणी सापळा लावला. शासकीय पंचासमक्ष एसीबी पथकाच्या हाती लाचखोर गजानन रामकिसन सर्जे अलगद अडकला. तो सध्या वेदांतनगर भक्ती लॉन्स मालेगाव रोडजवळ राज गॅलेक्सी येथे राहतो. मात्र मूळचा जिंतूर येथील असल्याचे सांगण्यात आले. जिंतूरच्या घरीही एसीबीच्या पथकाने छापा टाकला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाच लुचपत विभागाच्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपाधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हवालदार वच्चेवार, विनयकुमार नकुलवार, सय्यद खदीर, चालक मामुलवार यांच्या पथकाने केली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻