ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड (प्रल्हाद कांबळे)- नांदेडहुन नवी दिल्ली मार्गे अमृतसरला जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेस या रेल्वे गाडीला रेल्वे विभाग एक आरक्षित डब्बा लावण्यास विसरल्याचा अजब प्रकार आज नांदेडमध्ये दिसून आला. या प्रकाराने संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर रेल्वेच रोखून धरत जोरदार आंदोलन केले.
सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी नांदेडमध्ये आलेल्या शीख भाविकांनी सचखंड एक्सप्रेस नांदेड हुजूर साहेब- अमृतसर ही गाडी एस नाईन बोगी न लावल्यामुळे रोखून धरली. जीआरपी आणि आरपीएफ तसेच रेल्वे प्रशासनाने मध्यस्थी करून तब्बल दीड तासानंतर सदरची गाडी अमृतसरकडे रवाना केली. सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी होळीनिमित्त दिल्ली, अमृतसर, पंजाब भागातून मोठ्या संख्येने भाविक नांदेडमध्ये दाखल झाले होते. आज मंगळवार दिनांक 22 मार्च रोजी काही भाविक सचखंडचे दर्शन घेऊन व हल्लाबोल मिरवणूक संपल्यानंतर आपल्या गावाकडे निघाले होते. विशेष म्हणजे या भाविकांकडे चार महिन्यापासून रेल्वेचे काढलेले कन्फर्म तिकीट होते. पण आज जेव्हा ते नांदेड रेल्वे स्थानकावर आले तेव्हा रेल्वे प्रशासनाने सचखंड एक्सप्रेसला S9 हा डबा लावला नसल्याचे त्यांना दिसून आले.
या अजब प्रकाराने सारेच हैराण झाले आणि काहीवेळाने भाविक संतापले. हा प्रकार त्यांनी रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. पण इतकी गंभीर चूक होऊनही ते प्रवाशांना फारसा सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते. विसरून राहिलेला डबा रेल्वेला किती वेळात जोडणार आदी काहीही माहिती देण्यास ते तयार होत नव्हते. त्यामुळे अखेर या भाविक आणि प्रवाशांनी आरपीएफ कार्यालयासमोर प्लॉट नंबर एकवर उभी असलेली सचखंड एक्सप्रेस रेल्वे गाडी रोखून धरली. जोपर्यंत सदरचा डबा लावणार नाही तोपर्यंत गाडी सुटू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले.
अखेर रेल्वे प्रशासनाने S9 (एस नाईन) हा डबा रेल्वेला जोडून सदरची गाडी अमृतसरकडे रवाना केली. नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजता सुटणारी सचखंड एक्सप्रेस मंगळवारी साडेदहा ते अकरा वाजताच्या दरम्यान तब्बल दीड तासाने उशिरा सुटली. यावेळी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार, हवालदार उत्तम कांबळे, विजया कदम, कांचन राठोड, विनोद कोरडे, संदीप गोपने, राम कातकडे, आरपीएफचे अमित उपाध्ये व त्यांचे कर्मचारी तसेच रेल्वे प्रबंधक एस. एस. कालीचरण यांनी घटनास्थळी जाऊन प्रवाशांची मध्यस्थी केली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
