Sunday, October 6, 2024

अबब, चक्क पोलिसाच्याच नावे डमी अकाउंट उघडून साडेचार कोटींचा अपहार, खुद्द मॅनेजरचाही हात; नांदेडच्या रेणुका माता मल्टीस्टेट अर्बनमधील प्रकार, एकास अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- येथील चक्क एका पोलिसाच्याच नावे डमी अकाउंट उघडून त्या अकाऊंटच्या माध्यमातून तब्बल साडेचार कोटींचा अपहार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. नांदेडच्या रेणुका माता मल्टीस्टेट अर्बन शाखेत हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकारात खुद्द मॅनेजरचाही हात असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्र दाखल करून श्री रेणुका माता मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा गुरुकृपा मार्केट महावीर चौक नांदेड येथे खाते ( क्र. १०३३०४००३०००६७१) उघडले. या खात्यातून १३ मे २०१४ ते २० मार्च २०२३ दरम्यान चार कोटी ४६ लाख १९ हजार ५४१ रुपयांचा अपहर करून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक माणिक बेद्रे यांनी यातील एकाला अटक केली असून त्याला पोलीस कोठडीत पाठवले आहे.

येथील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अहमदनगर येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह लिमिटेडची शाखा गुरुकृपा मार्केट महावीर चौक येथे कार्यरत आहे. या शाखेत नांदेड पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी सोमनाथ जगन्नाथ पत्रे याचे आधार कार्ड व मतदान ओळखपत्राची झेरॉक्स करून बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत असे दाखवून त्यांच्या नावे गुरुकृपा मार्केट येथील शाखेत खाते उघडण्यात आले. त्या खात्यावर बनावट सही व अंगठ्याचा वापर करून १३ मे २०१४ ते २० मार्च २०२३ दरम्यान चार कोटी ४६ लाख १९ हजार ५४१ रुपयांचा व्यवहार करण्यात आला.

पंधरा दिवसांपूर्वी आयकर विभागाची पोलीस कर्मचारी सोमनाथ पत्रे यांना त्यांच्या अकाउंटबद्दल नोटीस आली. एवढ्या पैशाचे ट्रांजेक्शन कसे करण्यात आले अशा संदर्भातील नोटीस प्राप्त झाल्याने पोलीस कर्मचारी पत्रे हादरून गेले. त्यांनी लगेच वजिराबाद पोलीस ठाणे गाठून आलेली नोटीस दाखविली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. यावेळी या व्यवहारात याच बँकेचे शाखा व्यवस्थापक जितेंद्र रामभाऊ थेटे (राहणार पारबाला बुद्रुक तालुका अंबड जिल्हा जालना), गोवर्धन तुकाराम महाजन (राहणार इंजनगाव तालुका चाळीसगाव जळगाव), विलास श्रीराम वाघमारे (राहणार जंगमवाडी नांदेड) आणि कुलदीप प्रल्हाद वानखेडे (राहणार दत्तनगर नांदेड) या चौघांविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हा ब्लॅक मनी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून हवाला रॅकेटमार्फत हे व्यवहार होत असावेत अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. यात आणखीही बरीच नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माणिक बेद्रे यांनी अटक आरोपीला न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने प्रल्हाद कुलदीप वानखेडेला पोलीस कोठडीत पाठवले आहे. कुलदीप वानखेडे हा कुरियर सर्विसमध्ये काम करतो, त्याचे आणि पोलीस कर्मचारी सोमनाथ पत्रे यांची काही दिवसांपूर्वी ओळख झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी असेच अन्य काही डमी बँक खाते उघडकीस येण्याची शक्यता श्री बेंद्रे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. आरसेवार करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!