ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ अमित शहा यांची काँग्रेसवर कडाडून टीका
◆ उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल
◆ देवेंद्र फडणवीस यांचा अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा

नांदेड– अमित शहा यांनी नांदेडमध्ये आयोजित जनसंवाद सभेत राज्यातील लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा संकल्प जाहीर केला. भाजपाच्या महा- जनसंपर्क अभियान अंतर्गत जनसंवाद सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज शनिवार दिनांक १० जून रोजी नांदेडमध्ये संबोधित केले.
काँग्रेसची 65 वर्षाची सत्ता नष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात देशाचा जागतिक पातळीवर गौरव होईल असे काम केले. जगातील अनेक देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळचे करत आहेत. कोणी त्यांच्या पाया पडत आहे तर कोणी त्यांची स्वाक्षरी घेत आहे. हा देशाचा सन्मान आहे. एकीकडे नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर भारताचे नाव गौरवाने व सन्मानाने कोरल्या जावे यासाठी धडपड करत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विदेशात जाऊन देशाबद्दल बोलून देशाला अपमानित करत आहेत असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री तिरथसिंह चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, मंत्री अतुल सावे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, सूर्यकांता पाटील, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, शहर महानगर अध्यक्ष प्रवीण साले, प्रवीण चिखलीकर, मिलिंद देशमुख, विजय गंभीरे, आमदार तानाजी मुटकुळे, जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील भाजपाचे आजी- माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक तथा नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे पांडुरंग मूर्ती आणि संतांची टोपी घालून सत्कार केला. सायंकाळी साडेसहा वाजता सर्व मान्यवरांचे विचार पिठावर आगमन झाले.
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्र आणि नांदेडच्या जनतेचे अभिवादन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. नांदेडची भूमी गुरु गोविंदसिंग यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीतील असून त्यांनाही अभिवादन करतो. यूपीए सरकारच्या काळात देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजेच बारा लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला. मात्र आजही मागील नऊ वर्षात एकही भ्रष्टाचाराचा डाग आम्हाला लागला नाही किंवा विरोधक ते लावू शकत नाहीत. जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्यापूर्वी राहुल गांधी आणि शरद पवार म्हणाले होते की देशात रक्ताची नदी वाहेल. परंतु नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली असलेल्या सरकार पुढे साधा दगड सुद्धा मारण्याची हिंमत झाली नाही आणि होणार नाही. देशातील सर्वसामान्य गरिबांसाठी सरकारने विविध योजना आणल्या. आज देशाचे नाव जागतिक पातळीवर मोठ्या गौरवाने घेतले जाते. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची नीती स्पष्ट करावी की आपण कोणाच्या बाजूने आहोत. सत्तेसाठी भाजपला धोका देऊन व त्यांच्याच आमदारांना खासदारांना धोका देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. त्यांना ट्रिपल तलाक, मुस्लिम आरक्षण, राम मंदिर, वीर सावरकर यांच्या बद्दल बोलण्याची ताकद नाही म्हणजे ते बोलू शकत नाहीत.
राज्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर या शहरांचे नामकरण केले तेही उद्धव ठाकरे यांना मान्य आहे की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
देशात सर्व क्षेत्रात पायाभूत सुविधांसह विकासाचा रथ धावत आहे. वंदे मातरम सारख्या नवीन रेल्वे सुरू झाल्या, 74 नवीन विमानतळ सुरू झाले यासह वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळे महाविद्यालय नव्याने सुरू झाले. अयोध्या मंदिर झाले, विश्वनाथ कॅरीडोर, सोमनाथ मंदिर विकास झाला. यासह कोरोना सारख्या महामारीवर नरेंद्र मोदी सरकारने मात मिळविली. कोट्यावधी लोकांना मोफत लस दिली. आजही अन्नधान्य मोफत दिले जाते. गरिबांसाठी राहुल गांधी यांच्या काँग्रेसने काय केले. ६५ वर्षात ते करू शकले नाही ते नऊ वर्षात नरेंद्र मोदी सरकारने करून दाखवले. यावेळी शरद पवारवरही त्यांनी जोरदार टीका केली. येत्या 2024 च्या निवडणुकीमध्ये नांदेडसह महाराष्ट्रातील 45 जागा जिंकण्याचा आम्हा संकल्प असून जनतेने लोकसभेत भाजप उमेदवार निवडून द्यावेत आणि विकासाचा रथ असाच चालू ठेवावा असे आवाहन त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार अतिशय उत्तम काम करत असल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा
काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण आमच्या या सभेबद्दल बोलत आहेत की आता भाजपाला निवडून येण्याची खात्री नाही म्हणून सभा घेत आहेत. परंतु नऊ वर्षात जे मोदी सरकारने विकासात्मक काम केले ते आपणास 65 वर्षाच्या काळात करता आले नाही. त्याची माहिती देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तुमची मजल फक्त टुजी, थ्रीजी आणि सोनियाजी एवढ्या पुरतीच असल्याचे फडणवीस म्हणाले. जनतेचा महासागर दिसतोय. काँग्रेस पक्षाला अधूनमधून विजय मिळाला की महाराष्ट्रातही कर्नाटकासारखा पॅटर्न आणू. परंतु या ठिकाणी कुठलाही पॅटर्न चालणार नाही महाराष्ट्रात फक्त छत्रपती आणि नरेंद्र मोदींचा पॅटर्न चालणार असल्याचे ते म्हणाले. जेवढे विरोधक एकत्र येऊन जोर लावत आहे तेवढे त्यांचे उमेदवार सुद्धा निवडून येणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. उज्वला गॅस, किसान सन्मान योजना, आरोग्य सेवा, पंतप्रधान योजना कौशल्य विकास, पंतप्रधान पिक विमा मुद्रा योजना, अटल पेन्शन, सुकन्या यासह आदी योजना महाराष्ट्रात नरेंद्र मोदी सरकारने राबविल्या. जवळपास चार लाख कोटींची पायाभूत सुविधा क्षेत्रात कामं सुरू असल्याने त्यांनी सांगितले. राज्याचे डबल इंजिन सरकार वेगाने काम करत असून जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील नवीन शक्तीपीठ महामार्ग करतोय. मराठवाड्यात पाच जिल्हे या महामार्गाला जोडल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 22 हजार रुपये आम्ही देत आहोत. एकंदरीत जंगलात कितीही प्राणी एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाहीत तसे भाजपाला येणाऱ्या निवडणुकीत कोणीही पराभूत करू शकणार नाही असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यावेळी खासदार प्रतापरावांना त्यांनी तुमच्या सर्व आकांक्षा पूर्ण करू असा विश्वास दिला.
चंद्रशेखर बावनकुळे
आधुनिक भारताचे लोहपुरुष म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जात आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देश एका उच्च पातळीवर जात आहे. आपल्या एका मताने 65 वर्षाची परंपरा मोडीत काढली आणि देशाला एक वेगळी दिशा देण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. मागच्या काळातील अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खिशात कधीच पेन बघितला नाही. ते काय राज्याचा विकास करणार. शरद पवार यांनाही त्यांनी सडकून काढले. राष्ट्रीय पक्षाची मान्यता गेलेल्या पक्षाचा आज वर्धापन दिन आहे परंतु तेच आज मोदीविरुद्ध आवाज उठवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचेही बावनकुळे म्हणाले. सत्तेबाहेर गेल्यानंतर त्यांना ओबीसी आरक्षण, मुस्लिम आरक्षण दिसते आणि आता तर मुस्लिम आणि ख्रिश्चन चिंतेत असल्याचे शरद पवार म्हणत आहेत. महाराष्ट्र पेटविण्याचे काम शरद पवार करत आहेत असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढीसाठी पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी घराघरात जात आहे. फ्रेंड्स ऑफ मोदी संकल्प राबवून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्याचा काम करत आहे आणि विधानसभेला दोनशे अधिक जागा कुठल्याही परिस्थितीत आम्ही महाराष्ट्रातून निवडून देऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अमित शहाजी आपण दर महिन्याला जर आलात तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याशिवाय होणार नाही असे बावनकुळे म्हणाले.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदार करून आणि सर्वप्रथम नांदेडची निवड केली. त्याबद्दल अमित शहा यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. जिल्ह्याची अवस्था अतिशय वाईट होती. पन्नास वर्षे एकाच घरात सत्ता होती. अशोक चव्हाण यांनी एक किलोमीटर रस्ता करून दाखविला नाही आज मात्र समृद्धी महामार्गाचे काम त्यांना आठवत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्राकडून सहा हजार आणि राज्य सरकारकडून सहा हजार व राज्य सरकार सहा हजार रुपये देत आहोत. सरकारचा आदर्श योग्य आहे परंतु नांदेडसारखा आदर्श नाही. कारण आदर्श शब्दाची व्याख्या नांदेडमध्ये बदलली आहे. कोरोनामध्ये सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम भाजपानेच केले. नांदेड- देगलूर- बीदर रेल्वे मार्ग मोदी सरकारच्या काळात मंजूर झाला आणि त्यासाठी आता राज्य सरकारनेही 50% वाटा उचलल्याचे त्यांनी सांगितले. या रेल्वे मार्गाचे लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन करावे अशी विनंती त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली. तसेच नांदेड शहरांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये घरगुती पाईप लाईन गॅस द्वारे देण्यात यावा ही योजनाही सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच नांदेड- मुंबई- हैदराबाद वंदे मातरम, नांदेडचे विमानतळ, लेंडी प्रकल्प आदी महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावावे अशी त्यांनी आपल्या मनोगतात मागणी केली. यावेळी बोलताना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा कंठ दाटून आला. गरिबाचा देव विठ्ठल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्या पंढरपूरलाही आणि देहूला मोठा निधी पंतप्रधान यांनी प्रत्यक्ष भेटून दिला. सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत मी जनतेच्या सेवेत असतो असे ठामपणे खासदार चिखलीकर यांनी बोलून दाखवले.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, प्रवीण दरेकर, राम पाटील रातोळीकर, प्रवीण साले यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रम स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
