ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांना आज मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. संतप्त युवकांनी चव्हाण यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी चव्हाण यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात आज सोमवार दि. १ एप्रिल रोजी ही घटना घडली.
खा. अशोक चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या सभा, बैठका, भेठीगाठी चव्हाण घेत आहेत. खा. चव्हाण हे आज त्यांच्या पूर्वीच्या विधानसभा मतदार संघातील कोंढा गावात कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते. खा. चव्हाण गावात आल्याचे कळाल्यानंतर गावातील मराठा समाजाच्या संतप्त युवकांनी तिकडे मोर्चा वळवला आणि खा. चव्हाण यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ युवकांना रोखले. पोलीस आणि युवकांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक उडाली. युवकांनी खा. चव्हाण यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी शिताफीने तेथून गाडी रवाना केली. चव्हाण यांच्या ताफ्यातील इतर गाडी अडवण्याचा प्रयत्नही संतप्त युवकांनी केला. पण ती गाडीही भरधाव वेगाने तिथून काढून देण्यात आल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही. यावेळी युवकांनी “एक मराठा लाख मराठा”च्या घोषणा दिल्या. या घटनेमुळे राजकीय पुढाऱ्यांना अजूनही मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले.
विशेष बाब म्हणजे कोंढा हे गाव खा. अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भोकर विधानसभा मतदारसंघातील गाव आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻