ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
● नांदेड एज्युकेशन सोसायटीने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
नांदेड– येथील नांदेड एज्युकेशन सोसायटी या अत्यंत जुन्या आणि नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या लता मंगेशकर या सदस्या होत्या. या संस्थेच्या नांदेडमधीलच सायन्स कॉलेज आणि पीपल्स कॉलेजच्या उभारणीतही स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा मोठा हातभार आहे.
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने संस्थेच्या सदस्या लता मंगेशकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
http://epaper.godateer.com/ArticlePage/APpage.php?edn=Nanded&articleid=GSMCHR_MAIN_20220208_6_10
लता मंगेशकर यांनी त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दि. 1 जुलै 1956 साली एका गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन हैद्राबादमध्ये केले होते. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला निधी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स व सायन्स कॉलेजच्या इमारतीस देणगी म्हणून दिला होता. लता मंगेशकर यांनी संस्थेच्या महाविद्यालय उभारणीत दिलेल्या या बहुमूल्य योगदानानंतर त्यांना संस्थेचे सदस्य करून घेण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ हे या संस्थेचे संस्थापक आहेत.
सदरील देणगीतून संस्थेने इमारत बांधून या महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला दीनानाथ मंगेशकर लॅबोरेटरी असे नांव दिलेले आहे. सदरील वास्तु आजही सायन्स कॉलेज येथे त्यांची आठवण म्हणून उभी आहे. ही संस्थेसाठी एक अभिमानाची बाब आहे, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी शोक सभेत व्यक्त केली.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.प्रविण पाटील व सचिव सौ.श्यामल पत्की यांची भाररत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतींना उजाळा देणारी भाषणे झाली. त्यानंतर लता दीदींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सायन्स कॉलेज येथील दीनानाथ मंगेशकर लॅबोरेटरीला सर्व सदस्यांनी भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सीए डॉ.प्रविण पाटील, सचिव सौ.श्यामल पत्की, सहसचिव प्रफुल अग्रवाल, कार्यकारीणी सदस्य अॅड.सी.बी.दागडीया, नौनिहालसिंघ जहागिरदार, प्रा.पी.पी.चौधरी, प्रा.ई.एम.खिल्लारे, संस्थेचे सर्वसाधारण सभासद दीपनाथ पत्की, इंजि.दिनेश राठोड, प्राचार्य डॉ. आर.एम.जाधव, प्राचार्य डॉ.डी.यु.गवई, मुख्याध्यापक पी.पी. रेणकुंटवार, जे.बी.सावने आदी उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻