Monday, June 17, 2024

आठवणी लतादीदींच्या ! लातूर जिल्ह्यातील औराद येथे पडला होता, स्वर लतेचा पाऊस…!!

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

डिसेंबर महिना सुरु होता, गारवा संपून थोडे दिवस झाले होते… वातावरणात ऊन सावल्याचा खेळ सुरु होता. त्या दिवशी तारीख होती 4 डिसेंबर 1976, लातूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेला लागून असलेल्या औराद (शहाजानी) या वैचारिक पुढारपण असलेल्या गावात 1972 ला गावातल्या खाऊन पिऊन सुखी असलेल्या लोकांनी शारदोपासक शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने महाविद्यालय सुरु करण्याचा विचार केला.

त्यावेळी देशभरात एक स्वर्गीय स्वर घराघरातले कान रेडीओच्या माध्यमातून तृप्त करत होते. त्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सर्वानुमते लता मंगेशकर यांच्या वडिलांचे नाव “मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय ” हे ठेवण्याचे निश्चित केले. महाविद्यालय इमारतीच्या भूमिपूजन सोहळा 1972 ला झाला. पुढे चार वर्षात ही इमारत तयार झाली. 1974 ला मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचे दुसरे प्राचार्य म्हणून सदाविजय आर्य आले. सदाविजय आर्य यांचे वडील बन्सीलाल आणि काका शामलाल आर्य यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात खूप मोठे काम होते. तसे सामाजिक भान असलेले सदाविजय आर्य प्राचार्य म्हणून आले होते.

लातूर जिल्ह्याशी लता मंगेशकर यांचे घट्ट नाते होते. त्याला कारणही तसेच आहे. लता दीदींचे वडील स्व.मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी इथे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या उदघाटनासाठी ०४ डिसेंबर १९७६ ला लता मंगेशकर या औराद शहाजनी इथे आल्या होत्या. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण आणि लता दीदी यांची बहीण उषा मंगेशकर यांचीही उपस्थिती होती. औरादच्या शारदोपासक शिक्षण संस्थेच्यावतीने १९७१ मध्ये महाविद्यालय काढण्याचा ठराव ग.दी. माडगूळकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यानंतर सर्वानुमते लता दीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे नाव देण्याचे ठरले. यासाठी मंगेशकर कुटुंबीयांची रीतसर परवानगी कोल्हापूर इथे जाऊन घेण्यात आली. १० डिसेंबर १९७० ला लता दीदींच्या आई माई मंगेशकर, ग.दी. माडगूळकर यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाची पायाभरणी झाली. तर ०४ डिसेंबर १९७६ ला लता मंगेशकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. पुढे कॉलेजच्या आर्थिक मदतीसाठी २८ फेब्रुवारी १९८१ लता मंगेशकर यांच्या संगीत रजनीचा मोठा कार्यक्रमही झाला होता. या कार्यक्रमाला लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यांच्या आठवणींना संस्थेच्या अध्यक्ष विठ्ठलराव वलांडे गुरुजी यांनी उजाळा दिला.

पाऊस आणि लता मंगेशकर यांचे गाणे
मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाची इमारत बांधून पूर्ण झाली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते,स्व.शंकरराव चव्हाण.. ते उदघाटन कार्यक्रमाला येणार हे निश्चित झाले.लता मंगेशकर यांना या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला त्यांनी येण्याचे कबूल केले पण आपण गाण म्हणणार नसल्याचे सांगितले. त्या प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन झाले. ठरल्या प्रमाणे चार डिसेंबर 1976 या दिवशी कार्यक्रमाला सुरुवात झाली. साक्षात स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या आणि संपूर्ण देशात हा स्वर म्हणजे सरस्वती म्हणून पूजला आणि भजला जात होता, त्या गाणकोकिळेला बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी खूप खूप लांबून लांबून लोकं आली होती… जवळ पास सव्वा लाख लोकं त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मंचावर तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि लता मंगेशकर होत्या… प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य सदाविजय आर्य यांनी केले, प्राचार्य प्रास्ताविक संपवून मागे वळतायत तितक्यात अचानक पावसाची सर आली… लोकं उठायला लागली आणि प्राचार्यांनी तिथल्या तिथे वेळेचे गांभीर्य ओळखून म्हणाले ” हा पाऊस स्वर्ग लोकातून लता मंगेशकरांचे स्वागत करायला पाठवला आहे, जागेवरून कोणीही उठू नये, लता मंगेशकर यांचे गाणे ऐकायचे नाही का? लोकांनीही एकच गलका केला, आणि गाणं म्हणणार नाही असं म्हणून आमंत्रण स्विकारलेल्या लता दीदींनी… त्यांच्या भाषणाच्या वेळी गाणं सुरु केलं ते गाणे होते संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओवीचे ” मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरू कळियांसी आला” आणि सव्वा लाख लोकं पावसाची सर विसरून मंत्रमुग्ध झाले.पुन्हा एकदा गाण्याच्या कार्यक्रमासाठी लता मंगेशकर आल्या, असा दोन वेळा त्यांचा सहवास लाभला अशी ही सगळी माहिती प्राचार्य सदाविजय आर्य मला सांगत होते… आणि माझ्या डोळ्या समोर हे सगळे काल्पनिक चित्र उभे राहिले.

मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय संगीत विषय शिकविणारे राज्यातले पहिले महाविद्यालय ठरले
प्राचार्य सदाविजय आर्य सांगत होते, मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, लता, आशा, हृदयनाथ या सारख्या ज्यांच्या रक्तात संगीत असलेल्या व्यक्तींच्या वडिलांच्या नावाने आहे, त्यामुळे आम्ही बारावी मध्ये चार ऐच्छीक विषय घेऊन शिकता येत होते, असे करणारे आम्ही राज्यातले पहिले महाविद्यालय ठरलो ज्यांनी संगीत हा विषय आणला… त्यावेळी राज्याच्या संचालक चित्रा नाईक होत्या.. औरंगाबाद त्यांनी मराठवाड्यातील समस्या बद्दल बैठक ठेवली.. खूप महिन्या पासून प्रलंबित असलेला प्रश्न बैठकीच्या सुरुवातीला मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचे प्राचार्य कुठे आहेत म्हणून विचारणा केली आणि तो प्रश्न तिथल्या तिथे सोडविला.

लातूर जिल्ह्याला खूप मोठा इतिहास आहे. त्या इतिहासातील भारतरत्न लता मंगेशकर यांचा दोन वेळा लाभलेला सहवास आणि पावसात गाणे सुरु केल्या नंतर मंत्रमुग्ध झालेली सव्वा लाख लोक हे सगळा स्वर्ण इतिहास ज्यांच्या डोळ्यात साठवून राहिला आहे ते प्राचार्य सदाविजय आर्य हे मला सगळे सांगत होते.
या संस्मरणीय प्रवासाचा शेवट आज 6 फेब्रुवारी रोजी वसंत ऋतुच्या सुरुवातीला झाला… या ओळीने त्यांना शब्द सुमन वाहतो
आता विसाव्याचे क्षण
माझे सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत
त्याची ओढतो स्मरणी
भारत रत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 🌹🌹🙏🏻

युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!