ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोण उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण राहणार आणि कोण जाणार याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत अनेक खासदार उपस्थित राहिले नाहीत. त्यात हिंगोली-नांदेड-यवतमाळ-यवतमाळ या तीन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणारे खासदार हेमंत पाटील हेही अनुपस्थित होते. मात्र या अनुपस्थितीचे कारण वेगळे होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यापासून एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचे पडसाद जाणून घेण्याचे या बैठकीच्या मागचे नियोजन होते.
या बैठकीला शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदार उपस्थित होते तर 7 खासदार अनुपस्थित असल्याचे सांगण्यात येत होते. राज्यसभेवरील तिघांपैकी दोन खासदार हजर होते.
शिवसेनेचे 12 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. भावना गवळी, श्रीकांत शिंदे यांची अनुपस्थिती अपेक्षितच होती. मात्र मंडलिक, हेमंत पाटील, संजय जाधव यांच्या गैरहजेरीनं अनेकांना धक्का बसला. उपस्थित लोकसभा खासदारांमधे गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, प्रताप जाधव, सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावित आदींचा समावेश होता.
तर अनुपस्थित खासदारांमध्ये यवतमाळ-वाशिम – भावना गवळी, परभणी – संजय जाधव, कोल्हापूर – संजय मंडलिक, हिंगोली- नांदेड– हेमंत पाटील, कल्याण-डोंबिवली – श्रीकांत शिंदे, रामटेक – कृपाल तुमाने, दादरा-नगर हवेली – कलाबेन डेलकर आदींचा समावेश होता. संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी हे राज्यसभेचे खासदार उपस्थित होते. अनिल देसाई दिल्ली येथे असल्यामुळे ते गैरहजर होते.
खा.हेमंत पाटील शरद पवार यांच्यासोबत विमानाने मुंबईत
खासदार हेमंत पाटील बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे तेही एकनाथ शिंदे गटात जाणार या चर्चांना उधाण आले. इलेक्ट्रॉनिक आणि वेब माध्यमात तशा बातम्याही सुरू आहेत. पण सायंकाळच्या सुमारास हेमंत पाटील हे खा. शरद पवार यांच्यासह औरंगाबादहून मुंबईला रवाना झाले.
मुंबईत जाऊन थेट ‘मातोश्री’त
मुंबईत मातोश्री’वर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे ते एकनाथ शिंदे गटात गेले नाहीत हे स्पष्ट झाले आहे. पण मग ते बैठकीला गैरहजर का राहिले असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर खुद्द खासदार हेमंत पाटील यांनी खुलासा केला आहे.
आषाढी महोत्सव
खासदार हेमंत पाटील हे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा वर्षांपासून आषाढी महोत्सव हा कार्यक्रम घेत असतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे नांदेडकरांना हा महोत्सव पुन्हा अनुभवता येणार की नाही अशी शंका वाटत होती. मात्र कोरोनामुळे रद्द करावा लागलेला हा कार्यक्रम पुन्हा सुरू करुन खासदार हेमंत पाटील यांनी काल रविवारी नांदेडमध्ये हा कार्यक्रम घेतला. रात्री उशीरापर्यंत चाललेला हा कार्यक्रम संपवून ते आज सकाळी पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. याबाबतची कल्पना त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही दिली होती.
त्यामुळे खासदारांच्या बैठकीस ते अनुपस्थित राहिले. पण खासदार हेमंत पाटील हे बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे तेही एकनाथ शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू होऊन तशा बातम्याही सर्वत्र सुरू झाल्या. त्यामुळे हेमंत पाटील हे नांदेडहून औरंगाबादला गेले. आजच शरद पवार हेही औरंगाबाद येथून मुंबईकडे निघाले होते. सायंकाळच्या सुमारास हेमंत पाटील हेही खा. शरद पवार यांच्यासह औरंगाबादहून मुंबईला गेले. आणि त्यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे हेमंत पाटील यांच्याबाबतीत सुरू झालेल्या चर्चांवर तूर्तास पडदा पडल्याचे दिसत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻