ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ अशोकराव म्हणतात, हो भेट झाली !
मुंबई/ नांदेड– राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा जोरावर आली आहे. अशोकराव चव्हाण यांनी मात्र भेट झाल्याची कबुली दिली असली तरी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा ते करीत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनेही अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा म्हणजे निव्वळ खोडसाळपणा असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मागील काही दिवसांपासून पक्षांतर्गत वादामुळे नाराज आहेत. विधानसभेच्या अविश्वास ठरावाच्या वेळी त्यांची गैरहजेरी काँग्रेस पक्षाला खटकली आणि त्यामुळे त्यांना खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. तेंव्हापासून अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत.
त्यातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यात झालेली भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. एवढेच नाही तर अशोक चव्हाण हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अशी कबुली दिली आहे. परंतु या भेटीदरम्यान कुठेलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजप आणि शिंदे गटात समन्वयासाठी नियुक्त करण्यात आलेले भाजपचे पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांच्या घरी काल दि. १ सप्टेंबर रोजी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीत त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली,असे बोलले जात आहे. यामुळे कॉग्रेसमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. अशोक चव्हाण हे फक्त गणपती दर्शनानिमित्ताने आशिष कुलकर्णी यांच्या घरी गेले होते. यावेळी दुसरे नेते तिथे आले. मात्र त्याचा असा वेगळा अर्थ लावून आणि तर्क लावणं काही बरोबर नाही, असे काँग्रेसकडून सांगितले जात आहे.
आधीच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि त्यात त्यांची फडणवीस यांच्याशी झालेली गुप्त भेट! त्यामुळे ही भेट राजकीय नसावी यावर कोणाचाच विश्वास बसत नसल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण राज्यभरासह नांदेड जिल्ह्यात यामुळे चर्चेला पेव फुटले आहे. अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार का? यावर जोरदार चर्चा येथे सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, महानगरपालिका, अनेक नगरपालिका व नगर पंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहे. मागच्या महानगरपालिकेत त्यांनी एक हाती सत्ता मिळविली होती. मुस्लिमबहुल मतं एकगठ्ठा त्यांच्या पारड्यात पडतात. मुस्लिम आणि मागासवर्गीय मतांवर त्यांचे आतापर्यंत हे राजकीय यश विसंबलेले आहे. हे गणित पाहता ते खरोखरच काँग्रेस सोडतील का? अशा विविधांगांनी चर्चा सुरू झाल्या आहेत.
अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार, सोबतच नऊ आमदार सोबत घेऊन जाणार अशा चर्चा सोशल मीडियावर आज दिवसभर रंगल्या. रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायाच्या दर्शनानिमित्त शिवसेनेचे सचिव व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर मनोहर जोशी यांच्याही निवासस्थानी त्यांनी भेट दिली. या चर्चा सुरू असतानाच इकडे काँग्रेसला मोठे खिंडार पडणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे शुक्रवारी अशोक चव्हाण भाजपाचे वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची चर्चाही सोशल मीडियात सुरू झाली आहे. अशोक चव्हाण खरंच काँग्रेस सोडणार का? भाजपात जाणार का? यावरून केवळ काँग्रेस मध्येच नव्हे तर स्थानिक भाजपामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी नुकतेच काँग्रेस जोडो यात्रा सुरू केली आहे. व ती यात्रा लवकरच नांदेड जिल्ह्यात येणार आहे. त्यापूर्वीच अशोक चव्हाण काँग्रेसला बाय-बाय करतात की काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रदेश काँग्रेस म्हणते, हा सर्व खोडसाळपणा!
दरम्यान, या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने बाळासाहेब थोरात यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशोकरावजी हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे, माध्यमांना विनंती आहे त्यांनी हे थांबवावे, अशी विनंतीही थोरात यांनी केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻