Saturday, November 9, 2024

आमदार नितेश राणे यांना अखेर अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी; माजी खासदार निलेश राणेंवरही गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना  आज अखेर अटक झाली असून कणकवली न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे हे कणकवली न्यायालयात आज शरण आले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान नितेश राणे यांना अटक झालेली असतानाच त्यांचे मोठे भाऊ माजी खासदार निलेश राणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  काल न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घालून बाचाबाची केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितेश राणे हे आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्ज मागे घेऊन कणकवली न्यायालयात शरण गेले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांकडून १० दिवस पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती.

नितेश राणेंचा पीए राकेशच्या मोबाईलवरून हल्ल्यातील आरोपी सातपुते याच्याशी नितेश राणेंचे झालेले मोबाईल संभाषण व राकेश परब व नितेश राणे यांची चौकशी करणे यासाठी पोलीस कोठडी गरजेची असल्याची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. त्याला नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई, ऍड. उमेश सावंत यांनी जोरदार आक्षेप घेतला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मंगळवारी सत्र न्यायालयान राणेंचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आज दुपारी ते पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर काल न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्यासमोर सुनावणी झाली. पोलिसांच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत हे बाजू मांडत आहेत.

नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. नितेश राणे वकिलांसमवेत न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज काल सत्र न्यायालयाने फेटाळला होता.

मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे यांच्या अटकेवरून उलथापालथी सुरू होत्या. काही दिवस ते कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले.

आमदार नितेश राणे यांचा राज्य सरकारवर आरोप
दरम्यान कणकवली न्यायालयात हजर होण्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर आरोप केला. सरकार मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत मी कणकवली न्यायालयात हजर होत आहे असे ते म्हणाले.

निलेश राणेंवरही गुन्हा
नितेश राणे यांना अटक झालेली असतानाच त्यांचे मोठे भाऊ माजी खासदार निलेश राणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सिंधुदुर्ग न्यायालयासमोर काल मोठ्या घडामोडी घडल्या. जामिन फेटाळला गेल्यानंतर राणे न्यायालयातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे यांनी पोलिसांना गाडी अडवल्याबाबत जाब विचाण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जतही घालण्यास सुरुवात केली. मला कायदा शिकवू नका, असे म्हणत त्यांनी पोलिसांशी बाचाबाची केली, याच कारणावरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!