ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
▪️ हे जे सुरू आहे ते चुकीचे -आमदार कल्याणकर
नांदेड- शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडण्यात आल्याची घटना आज घडली आहे. नांदेड शहरापासून जवळच असलेल्या देगाव कुऱ्हाडे येथे ही तोडफोड करण्यात आली आहे. परंतु हे जे सुरू आहे ते चुकीचे असल्याची प्रतिक्रिया आमदार कल्याणकर यांनी “गोदातीर समाचार” शी बोलताना व्यक्त केली आहे.
आमदार कल्याणकर हे देगाव कुराडे येथे एका लग्न समारंभासाठी आज रविवार दि. १७ मार्च रोजी दुपारी गेले होते. यावेळी त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. हा प्रकार दुपारी साडेबाराच्या सुमारास देगाव कुराडे येथे घडला. येथील ग्रामपंचायत सदस्य विश्वंभर कदम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी आमदार बालाजी कल्याणकर हे गेले होते.
लग्न मंडपासमोर अज्ञातांनी त्यांच्या गाडीची ही तोडफोड केली. यात गाडीची मागची काच फोडून टाकण्यात आली आहे. गाडी फोडणारे नेमके कोण आहेत? याचा पोलीस शोध घेत आहेत. आमदार कल्याणकर यांनी शिवसेना सोडून सुरत गाठले होते, तेव्हाही त्यांना नांदेडमध्ये मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, घटनास्थळाला नांदेड ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जॉन बेन, अर्धापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी भेट दिली आहे.
आमदार बालाजी कल्याणकर यांनी याबाबत बोलताना सांगितले की, या समाज भावना आहेत. त्याला आपण काही करू शकत नाही. परंतु हे जे सुरू आहे ते चुकीचे आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तर अवघड होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार कल्याणकर यांनी “गोदातीर समाचार” शी बोलताना व्यक्त केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻