Saturday, July 27, 2024

उद्यापासून होट्टल महोत्सव ! गीत- गायन- वादन- नृत्य, गण-गवळण-गोंधळ आणि लावणीही; मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेले होट्टल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ तीन दिवस दररोज सायंकाळी विविध कार्यक्रमांची मांदियाळी

 ◆ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

लेख: होट्टल ! मंदिर नव्हे ती आहे एक समृद्ध विरासत ! – विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

नांदेड- तेलंगणा आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेल्या देगलूर पासून ८ किमी अंतरावरील होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर हे चालुक्य शैली एक सुस्थितीत कोरीव लेणे असलेले मंदिर आहे. मराठवाड्याच्या या समृद्ध वारसा स्थळाला पुढे आणण्यासाठी व या भागातील लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून नवनवीन साधणे उपलब्ध व्हावीत यादृष्टिने होट्टल महोत्सवाचे आयोजन केले जात असते. मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख म्हणून होट्टल महोत्सवाकडे पाहिले जाते. बहुप्रतिक्षेत असलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ उद्या दि. ९ एप्रिल रोजी होत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून खासदार प्रतापतराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे हे प्रमुख अतिथी म्हणून या समारंभास उपस्थित राहणार आहेत.

शनिवार ९ एप्रिल ते सोमवार ११ एप्रिल या तीन दिवसीय समारोहात पहिला दिवस प्रथितयश गायक मंगेश बोरगावकर यांच्या सदाबाहर गाण्यांची मैफल होणार आहे. शनिवार ९ एप्रिल रोजी सायं. ५.३० वा. या महोत्सवाचा मुख्य उद्घाटन समारोह झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरूवात होईल. रविवार १० एप्रिल रोजी सायं. ५.३० ते ६.००यावेळेत औरंगाबाद येथील खंडेराय प्रतिष्ठाण गण-गवळण-गोंधळ हा लोककला प्रकार सादर करेल. गायन, वादन, नृत्य व लोकगीत याचे सुरेख मिश्रण या कार्यक्रमात असेल. ललीत कला केंद्र पुणेच्या कुमारी श्रृती संतोष पोरवाल या कथ्थक नृत्य सादर करतील. यानंतर ऐनोद्दीन फखरोद्दीन वारसी व संच बासरी वादन करतील. सायं. ८ ते ९ या कालावधीत राजेश ठाकरे हे शास्त्रीय गायन, डॉ. भरत जेठवाणी हे शास्त्रीय नृत्य तर विजय जोशी हे मराठी पाऊल पडते पुढे, मराठी लोकरंग हा कार्यक्रम सादर करतील. सोमवार ११ एप्रिल रोजी औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा येथील माजी सरपंच भास्करराव पेरेपाटील हे लोकसहभागातून विकास याबाबत लोकप्रबोधन करतील. यानंतर स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव खास लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून कु. सोनल भेदेकर, कु. विद्याश्री येमचे, “अप्सरा आली”च्या अर्चना सावंत व संच हे लावणीचा कार्यक्रम सादर करतील.

याचबरोबर या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास विधान परिषदेचे सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमर राजूरकर, राम पाटील रातोळीकर, विधानसभा सदस्य आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एल. आणेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

राज्य शासनाचा पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव-2022 संपन्न होत आहे. आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून या महोत्सव संपन्न होत आहे. या महोत्सवाचा लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पर्यटन उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, होट्टल येथील सरपंच हनिफाबी युसूफमिया शेख यांनी केले आहे.

लेख :

होट्टल : मंदिर नव्हे ती आहे एक समृद्ध विरासत ! 

प्रत्येक भू-भागाला स्वत:चे असे एक वैशिष्ट्य असते. त्या वैशिष्ट्यांच्या जोरावर तो भू-भाग नावारुपास येतो, ओळखला जातो. ही वैशिष्ट्य नैसर्गिक संसाधनापासून समृद्ध होत येतात. निसर्गाची जी पाच तत्वे आहेत ही सर्वत्र समान असतातच असे नाही. या पाच तत्वांच्यापलीकडे निसर्गही किती सारी आपली जैवविविधता, पाऊल खुणा घेऊन असतो, याचा आपल्याला माग काढता येणार नाही. आपल्या गोदावरीचाच काठ आणि भूप्रदेश लक्षात घेतला तर खूप सारी विविधता आणि समृद्धता आपल्या लक्षात येईल.
 
एरवी ज्या प्रदेशात बारमाही जलस्त्रोत आणि समृद्ध जमीन आहे तोच भू-भाग उत्तम अशी एक धारणा आपली असते. यात चुकीचे काही असण्याचा प्रश्न नाही. परंतू ज्या भागात पर्जन्यमान कमी आहे, डोंगरांच्या रांगा अधिक आहेत, विरळ वनसंपदा आहे, पाण्याचे दुर्भिक्ष आहे तो भू भाग संपन्न नाही, असे म्हणता येणार नाही. आपल्या गोदावरीचा काठ आणि तिच्या भोवताली असलेल्या डोंगररांगा याचे उत्तम उदाहरण आहे. गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांच्या काठाने मराठवाड्याला सूपीक आणि भरघोस पीक देणारी जमीन दिली आहे. हा काठ सोडून थोडे अंतर दूर झालात की जमिनीचा पोत माळरान आणि खडकांना पोटात घेतलेला पदोपदी आढळतो. अशा नैसर्गिक स्थितीत सातवाहन काळापासून मराठवाड्यातील गोदावरीच्या काठाने दिलेली भरभराट नजरेआड करता येत नाही. सातवाहन राजाने व्यापाराला उत्तेजन दिल्याचे अनेक पुरावे आहेत. त्यांनी दळणवळण व्यवस्था सुरक्षित ठेवली. प्रतिष्ठान, धान्यकटक, कल्याणी, तेर आदी व्यापारी केंद्र यामुळे विकसित होऊ शकली. यातील काही व्यापारी मार्ग मराठवाड्यातून जात होते.

सातवाहन पासून चालुक्य, राष्ट्रकूट काळातही हा व्यापार सुरू होता. मराठवाड्यातील सर्वच भागात संपन्नता होती, असे भू भागावरुन म्हणता येणार नाही. अजिंठ्यापासून वेरूळ पर्यंत, वेरुळ पासून जालनाच्या काठाने विदर्भाकडे, बीड जिल्ह्यापासून लोह्यापर्यंत, लोहा-कंधार पासून मुखेड पर्यंत, माहूर पासून किनवट व पुढे तेलंगणा पर्यंत, देगलूर पासून थेट तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सिमेपर्यंत लहान-मोठ्या अनेक डोंगररांगा मराठवाड्याच्या भूमीने आपल्या अंगाखांद्यावर जपल्या आहेत.
 
या डोंगररांगा त्या-त्या काळातील जनजीवनाच्या उपयोगितेला फारशा सहाय्यभूत नव्हत्या. याला कारण म्हणजे पाण्याची कमतरता व दुसरा भाग म्हणजे आत असलेला डेक्कन ट्रॅप ! पाषाना शिवाय दुसरे काय ? या दगडातही कधी काळी हजारो वर्षांपूर्वी आपल्याच मानव वंशाचे घटक असलेल्या व्यक्तींनी याच पाषणातून कला सौंदर्यदृष्टि प्रत्ययास दिली. यासाठी त्यांनी केवढी साधना केली असेल ? पाषाणात खूप साऱ्या आकारांना शोधून प्रत्येक शिलाच्या आकारानुसार त्यात अप्सरांपासून नर्तीकांपर्यंत, देवाधिकांपासून प्राणीमात्रा पर्यंत शिल्प साकारणे हे तर प्रत्यक्ष जन्माला घालण्या पेक्षा कितीतरी आव्हानात्मक ! काय ध्येय घेऊन ही माणसे आयुष्यभर त्या दगडांच्या सानिध्यात राहिली असतील ? कित्येक वर्षे त्यांनी यासाठी कष्ट उपसून एवढ्या मोठ्या वैभव संपन्नतेचा वारसा पुढे केला असेल ?

हा समृद्ध वारसा चालुक्याच्या काळापर्यंत व पुढेही आपणास हामखास आढळतो. नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, खानापूर, बाऱ्हाळी आदी भागात चालुक्याच्या काळात अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकलेने परिपूर्ण असलेली मंदिरे उभारली गेली. देगलूर पासून 8 किमी अंतरावर असलेले होट्टल हे अशाच एका समृद्ध शिल्पकलेचा वारस असलेले ठिकाण ! राष्ट्रकुटानंतर या भागावर राज्य केले ते कल्याणी, चालुक्यांनी. नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्याशी या घराण्याचा असलेला संदर्भ आपल्याला अनेक शिलालेखातून लक्षात येतो. मंदिर उभे करणे, एखादा तलाव उभा करणे, पाण्याची बाराव उभी करणे याकडे केवळ नागरीकरणाच्या सुविधेच्या नजरेतून पाहणे उचित ठरत नाही. त्या-त्या काळातील राज्य चालवणाऱ्या व्यक्तींनी सौंदर्य व सांस्कृतिक कला, कौशल्याला पुढच्या पिढीपर्यंत सतत वाहते कसे ठेवता येईल याचा ध्यास घेऊन ही निर्मिती केली असेल यात शंका नाही. आपल्या पूर्वजांकडून मिळालेला हा एक समृद्ध वारसा म्हणून पहावे लागेल. यातील शिलालेख हे सणावळ व नावाच्या नोंदीचे एक संदर्भ म्हणून पाहणेही चुकीचे आहे. यात त्या काळातही ऐतिहासिक संदर्भासह किती सारे आव्हाने घेऊन हे वैभव त्यांनी उभे केले असेल याची तपश्चर्या आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यातील सांस्कृतिक मूल्य आपण लक्षात घेतले पाहिजेत. यातील देवादिकांच्या भक्ती समवेत, जी कल्पकता, जी कला कौशल्यता, जे वास्तू स्थापत्य यांच्या निर्मात्यांनी जपले, अभ्यासले ते आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.
 
होट्टल आणि होट्टलचा सारा परिसर हा अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प वैभव घेऊन मंदिरांनी गजबजलेला म्हणून याची नोंद आहे. होट्टलच्या परिसरात अनेक ठिकाणी त्याचे संदर्भ आढळतात. होट्टलच्या परिसरात जी मंदिरे उभी आहेत त्या मंदिराच्या भिंतीवर एकादशरूद्र, चंडिका, शैव, वैष्णवद्वारपाल, गणेश, काली, शत्रू मर्दिनी, रती, नर्तीका, पुटलिका, शिव नटराज असे कितीतरी सुस्थितीत असलेली शिल्पे आपणास पहावयास येथे आढळतात. चालुक्याची उपराजधानी म्हणूनही होट्टलकडे पाहिले जाते. होट्टल हे एक विद्या केंद्र, पाठशाळा यांनी परिपूर्ण होते, असे सांगितल्या जाते.

मराठवाड्याच्या सांस्कृतिक वारसांपैकी तेलंगणा आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेला होट्टल येथील समृद्ध सांस्कृतिक वारसा हा नव्या पिढीपर्यंत पोहचला पाहिजे. या भागातील असलेले हे समृद्ध ऐतिहासिक संदर्भानी परिपूर्ण दालन नव्या पिढीकडून अभ्यासले गेले पाहिजे. ही एक समृद्ध विरासत आहे. ही विरासत लोकसहभागातून, सर्वांच्या कर्तव्य तत्पर जबाबदारीतून जपली गेली पाहिजे. या स्थळाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ठ मूल्यही आहे. हे मूल्य इथल्या लोकांनी जपून ठेवले आहे. या भागात या निमित्ताने पर्यटनाला जर चालना देता आली तर त्या लोकांच्याही उपजिविकतेला आधार होईल. ही सांस्कृतिक धरोहर दरवर्षी एक कटिबद्धता घेऊन पुढे प्रवाहित होईल, हा व्यापक उद्देश ठेऊन “होट्टल महोत्सव” सुरू करण्यात आला आहे. यात महाराष्ट्र शासनासह, पर्यटन विभागासह, इथले इतिहासप्रेमी, इन्टॅक सारखी ऐतिहासिक वारसा जपणारी संस्था, स्थानिक नागरीक यांचा मोलाचा वाटा आहे.

हा महोत्सव येथील पर्यटनाला चालना मिळावी, यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, स्थानिक कलावंतांना आपल्या कलागुणांना सादर करण्यासाठी व्यासपिठ उपलब्ध व्हावे यादृष्टिने शासनाचा पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन याकडे पाहते आहे. ही कटिबद्धता या समृद्ध वारसेला जपण्याची आहे. हा महोत्सव समृद्ध वारसेसह लोकसहभागतीचे एक आदर्श मापदंड म्हणूनही ओळखल्या जाईल. चला आपणही या महोत्सवाचा एक भाग होऊ यात.
 
–        विनोद रापतवार,
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!