ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर : लग्नसोहळ्यासाठी पाहुणे म्हणून आलेली तीन मुलं आंघोळीसाठी कोल्हापुरी बंधाऱ्यात गेली असताना बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. बंधाऱ्याच्या ठिकाणी पाय घसरून पडल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द गावात आज सकाळी घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द येथे आज २७ मे रोजी तुळशीदास तेलंगे यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. विवाह सोहळ्यासाठी तेलंगे कुटुंबीयांचे पाहुणे रात्रीच येथे दाखल झाले. या लग्नासाठी पाहुणे म्हणून आलेले संगमेश्वर बंडू तेलंगे (वय १३), चिमा बंडू तेलंगे (वय १५, रा . चिमेगाव, तालुका कमलनगर, कर्नाटक) व एकनाथ हनुमंत तेलंगे (वय १५, रा. निडेबन, उदगीर) हे तिघे आंघोळीसाठी तिरु नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावर गेले. आंघोळ करीत असताना एकाचा पाय निसटला व तो बंधाऱ्यात गेला. यानंतर एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करताना तिघेही जण बंधाऱ्यात बुडाले. या बंधाऱ्यामध्ये खूप पाणी असल्यामुळे त्यांना वर येता आले नाही. त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी सुरुवातीला मृतदेह काढण्याचे प्रयत्न केले. परंतु पाणी जास्त असल्यामुळे त्यांना मृतदेह काढता आले नाहीत. त्यामुळे घटनेची माहिती जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ उदगीर येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यामध्ये उतरुन तिघांचे मृतदेह शोधून बाहेर काढले.
घटनास्थळी तहसीलदार सुरेखा स्वामी, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, मंडळ अधिकारी सुरेवाड, तलाठी उमाटे यांनी भेट दिली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ऐन विवाहाच्या दिवशीच पाहुण्याकडील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे तेलंगे कुटुंबीयांवर आणि एकूणच गावावर शोककळा पसरली होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻