ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ सभेसाठी अनेक सदस्य जिल्हा परिषदेत पोहोचल्याने उडाला गोंधळ
नांदेड– आज गुरुवारी दि. १७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा ‘ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन’ घ्यावी या वादातच पार पडली.
नांदेड जिल्हा परिषदेत आज गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. पण सभा ऑफलाईन घ्यावी, यासाठी अनेक सदस्य जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. परंतु जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी सदस्यांची मागणी धडकावून लावत, सभा ऑनलाइन घेत सर्व विषय मंजूर करत सभा संपवली. यावेळी उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, सभापती संजय बेळगे, एड. रामराव नाईक, सुशीला बेटमोगरेकर यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
सभा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी अर्थ सभापती प्रविण पाटील चिखलीकर, माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, विजय धोंडगे, माणिक लोहगावे, गंगासागर, विजय बास्टेवाड, साहेबराव धनगे यांनी सभा ऑफलाईन घेण्याची मागणी अध्यक्ष व प्रशासनाकडे लावून धरली. मात्र, अध्यक्षा अंबुलगेकर यांनी ही मागणी अमान्य करीत सर्व सदस्यांना ऑनलाईन जॉईन होण्यास सांगितले. यावर संतप्त झालेल्या सदस्यांनी नकार देत प्रशासनाचा निषेध नोंदवत ऑनलाईन सभेवर बहिष्कार टाकला.
सभा सुरू होण्यापूर्वी नाराज सदस्य ऑनलाइन रुजू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेत दाखल झाल्याने काही काळ प्रशासनाची धांदल उडाली. सभापती संजय बेळगे यांना या बाबीची कल्पना मिळताच त्यांनी नाराज सदस्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पहावयास मिळाले. काही सदस्यांनी समान निधी, अध्यक्ष पदाधिकाऱ्यांविरूद्धचा पाढाच माध्यमांसमोर मांडत प्रशासन व पदाधिकारी यांचा निषेध केला. यानंतर काही वेळातच सभा संपल्याचे त्यांना सांगण्यात आले.
27 रोजी शिक्षकांना पुरस्कार वितरण सोहळा
दि. 27 फेब्रुवारी रोजी कुसुम सभागृहात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत 64 शिक्षकांना पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार दोन वर्षापासून प्रलंबित होता. गुरूगौरव पुरस्कार शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी सांगितले.
पंधरा दिवसात ऑफलाइन सर्वसाधारण सभा
पंधरा दिवसात ऑफलाइन सर्वसाधारण सभा लावणार, आजची सभा परिपत्रकानुसार कोरोनामुळे ऑनलाईन घेण्यात आली, मन दुखवण्यासाठी नाही, असे अध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ऑफलाईनसाठी काहीच दुमत नाही. शासनाच्या परिपत्रकानुसार सभा झाली, कोरम पूर्ण झाला होता, असेही सांगण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻