ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावून मुलींचे कन्यादान करणार असल्याची माहिती औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यातच आपले चिरंजीव परिक्षित पवार यांचाही विवाह लावणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
नैसर्गिक संकट, नापिकी, कर्जबाजारीपणा अशा विविध कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह लावून देणार असल्याची माहिती औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलींचा यात समावेश असणार आहे. विशेष बाब म्हणजे याच सामूहिक विवाह सोहळ्यात अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव परिक्षित पवार यांचाही विवाह होणार असल्याचे आ. पवार यांनी जाहीर केले. औसा शहरातील उटगे मैदानात बुधवार, १० मे २०२३ रोजी हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. औसा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आत्महत्या केलेल्या १७ मुला-मुलींची नोंदणी झालेली असून यात ०९ मुली आणि ०८ मुलांचा समावेश आहे. यातील सर्व मुलींचे कन्यादान आपण स्वतः करणार असून सर्व मुलींना संसार उपयोगी साहित्यही देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नापिकी-कर्जबाजारीपणा यामुळे मुलीचा विवाहाच्या चिंता लागलेल्या औसा तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर आपण शेतकरी आत्महत्या केलेल्या मुला-मुलींचे विवाह लावण्याचा संकल्प केल्याचे यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केले. या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अभिमन्यू पवार यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक मंत्री भाजपसह विविध पक्षातील दिग्गज नेत्यांची हजेरी राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
या पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, प्रा. सुधीर पोतदार,युवराज बिराजदार, भाजपचे औसा तालुका सरचिटणीस संजय कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य बंकट पाटील यांची उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻