Friday, July 19, 2024

काँग्रेस कार्यकर्तीवरील गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण; स्वतःच गोळीबार करवून घेतल्याचे तपासात उघडकीस, पिस्तुलासह दोघांना अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, जखमी सविता गायकवाड यांच्या अडचणीत वाढ

नांदेड- आपल्या विरुद्ध दाखल गुन्ह्याचा वचपा काढण्यासाठी शहराच्या बाफना उड्डाण पुलावर सविता गायकवाड यांनी फायरिंग करवून घेतली. ह्या गुन्ह्याचा कट उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला आहे. पोलिसांनी नांदेडच्या बळीरामपूर भागातून दोघांना पिस्तूलसह अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे जखमी सविता गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातमी 👇🏻

दिनांक 9 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता बाफना ब्रिज नांदेड या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्या सविता बाबुराव गायकवाड रा. शक्तीनगर, नांदेड यांचेवर आरोपी रहीमखान नुरखान व त्याचा भाऊ जाफर रा. एकबालनगर, परभणी यांनी व इतरांनी पिस्तुलाने फायरींग करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद सविता गायकवाड यांनी दिली. या फिर्यादीवरून पोलीस ठाणे इतवारा, नांदेड येथे गुन्हा रजिस्टर नंबर 12 / 2023 कलम 307,34 भादवि सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, यांनी या प्रकरणात नेमके सत्य काय आहे, हे शोधुन काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले. त्यांनी व त्यांचे पथकातील सपोनि पांडुरंग माने, पोउपनि दत्तात्रय काळे यांनी त्या संपूर्ण घटनेचा मागावा घेतला. परभणी येथील रहीमखान नुरखान व त्याचा भाऊ जाफर रा. एकबालनगर, परभणी यांना दिनांक 10 जानेवारी रोजी रात्रीच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केला नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी तपासचे उलट चक्र सुरु केले. तेव्हा धक्कादायक सत्य उघडकीस आले. मागील सहा महिन्यापुर्वी आयचर वाहन चोरी प्रकरणात पोलीस ठाणे भोकर येथे रहीमखान रा. परभणी याने सविता गायकवाड व त्यांचा साथीदार आतीकखान रा. नांदेड यांचे नांव घेतले होते. त्यामुळे त्या घटनेचा राग मनात धरुन दिनांक 6 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता  सविता गायकवाड व फैसल हे किरायाची फोरव्हीलर घेऊन रहीमखान याचे घरी परभणी येथे गेले होते. तेथे रहीमखान व सविता गायकवाड यांचा वाद झाला, त्यातुन रहीमखान याने पोलीस ठाणे नवामोंढा, परभणी येथे सविता गाकयकवाडविरुध्द दिनांक 7 जानेवारी रोजी पोलीस ठाणे नवामोंढा परभणी गुरनं. 04/2023 कलम 452, 323, 504, 506, 34 भादंविचा गुन्हा दाखल केला होता.

याचाच राग मनात धरून रहीमखान व त्याचा भाऊ जफरखान यांच्याविरुद्ध कट रचण्यात आला. त्यांना कसेही करुन कोणत्याही गुन्ह्यात अडविण्याचे सविता गायकवाड यांनी ठरविले होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यानुसारच बुधवार दिनांक 11 जानेवारी रोजी वर नमुद गुन्ह्याचे घटनेमध्ये स्था.गु.शा. चे पोनि स्थागुशा व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधीकारी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी किरण सुरेश मोरे रा. धनेगांव व आवधुत ऊर्फ लहुजी गंगाधर दासरवाड रा. बळीरामुपर नांदेड यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली. तेव्हा त्यांनी सदर गुन्ह्याचा व रचण्यात आलेल्या कटाचा सर्व उलगडा केला.

त्यांनी सांगितले की, दिनांक 9 जानेवारी रोजी सविता गायकवाडने गोपीनाथ बालाजी मुंगल रा. धनेगांव व किरण सुरेश मोरे रा. धनेगांव, आवधुत ऊर्फ लहुजी गंगाधर दासरवाड रा. बळीरामुपर, विकास कांबळे रा. हदगांव ह.मु. धनेगांव यांना फोन करुन घरी बोलावुन घेऊन, मला परभणी येथील रहेमतखान व जफरखान हे परेशान करीत आहेत, त्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, मला त्यांना धडा शिकवायचा आहे, असे म्हणुन किरण मोरे व गोपीनाथ मुंगल यांना पिस्टल घेऊन बाफना येथे या, मला गोळी मारुन निघुन जा असे सांगितले. या कटाप्रमाणे किरण मोरे व गोपिनाथ मूंगल हे पिस्टल घेऊन बाफना ब्रिजवर येथे आले. सविता गायकवाड ही त्या दोघांची वाट पहात बाफना ब्रिजवर थांबली होती. किरण मोरे व गोपिनाथ मूंगल हे तेथे आले. त्यानंतर बाफना ब्रिजवर किरण मोरे हा ये- जा करणारे वाहनावर वॉच ठेवुन होता, त्याच रात्री 11 वाजता बाफना ब्रिजवर कोणीही नसल्याची संधी साधुन सविता गायकवाडने सांगितल्याप्रमाणे गोपिनाथ मुंगल याने सविता गायकवाड हीचे डाव्या दंडावर पिस्टलमधुन एक गोळी झाडली.

त्यानंतर तेथुन गोपिनाथ मुंगल व किरण मोरे हे निघुन गेले. आणि सविता गायकवाड हीने पोलिसांना फोन करुन परभणी येथील रहीमखान व त्याचा भाऊ जफरखान यांनी मला रस्त्यात बाफना ब्रीजवर आडवुन गोळी मारुन मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशी माहिती देऊन पोलिसांना बोलावुन घेतले. घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी सविता गायकवाड हीस तात्काळ सरकारी दवाखाना, विष्णुपुरी नांदेड येथे उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर सविता गायकवाड यांचे तक्रारीवरुन पोलीस ठाणे इतवारा गुन्हा रजिस्टर क्र. 12/2023 कलम 307,34 भादंवि सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम हा गुन्हा दाखल आहे. पण आज सर्व कट उघडकीस आला आहे.

सविता गायकवाड हीचेवर फायरींग करण्यासाठी वापरलेली पिस्टल घेऊन गोपिनाथ मुंगल व विकास कांबळे हे पळुन गेले आहेत. गोपिनाथ मुंगल यांने आमचेकडे ठेवलेली दुसरी पिस्टल व चार काडतुस आमच्याकडे आहे असे म्हणून आवधुत दासरवाड याने एक पिस्टल व चार जिवंत काडतुस हजर केले. या दोन आरोपीकडून मिळून आलेली पिस्टल व काडतुस जप्त करण्यात आले असुन, यात पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे शस्त्र अधिनियम नुसार वेगळा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि दत्तात्रय काळे, पदमा कांबळे, तानाजी येळगे, विलास कदम, मोतीराम पवार, महेश बडगु, राजु सिटीकर, गंगाधर घुगे, मारोती मुंडे, दादाराव श्रीरामे, हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!