ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
किनवट (जि. नांदेड)- बचतगटाकडून वसूल केलेली रक्कम लुबाडण्यासाठी एका खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यावर छऱ्याच्या बंदुकीने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना गोकुंदा परिसरात आज शनिवारी दि.१० रोजी घडली.
यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील साजेगाव येथील स्पंदन मायक्रो फायनान्स कंपनीचे वसुली कर्मचारी वैभव सुधाकर रोडगे हे शनिवारी सकाळी वसुलीसाठी गोकुंदा परिसरात आले. गोकुंद्याच्या सिद्धार्थनगरात महिला बचतगटाची वसुली बैठक घेतली.रक्कम वसूल करुन ते मुख्य रस्त्याकडे येत असताना बळीराम पाटील महाविद्यालयाच्या मागच्या बाजूस बुलेटवर पाळत ठेवून असलेल्या दोघांनी रोडगे यांना रस्त्यात अडविले. त्या दोघा अज्ञातांनी रोडगे यांची पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यास प्रतिकार केल्यानंतर रोडगे व त्या दोघांत झटापट झाली.
या झटापटीतच दोघांपैकी एकाने रोडगे यांच्यावर छऱ्याच्या बंदुकीने गोळीबार केला. यात रोडगे यांच्या मांडीत गोळी लागल्याचे सांगण्यात आले. जखमी वैभव रोडगे यांना गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्यांना यवतमाळला पाठविण्यात आले. यापूर्वी गोकुंदा परिसरातच दि.२७ फेब्रु.२०२३ रोजी एका खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून अज्ञात भामट्यांनी साडेतीन लाखांची रोकड लंपास केली होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻