ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– दिवसेंदिवस कमी होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोना परतीच्या मार्गावर असल्याचे आता स्पष्ट होत आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने महापालिकेकडून भक्ती लॉन्स येथे सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे.
शहरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्यास रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या वतीने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सूचनेवरून मालेगाव रस्त्यावर असलेल्या भक्ती लॉन्स मंगल कार्यालयात कोवीड सेंटर तयार केले होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने हे सेंटर बंद करण्यात आले असून बेड, गाद्या व अन्य साहित्यांची जमवाजमव करून ठेवण्यात आले आहे.
संबंध जगाला बेजार केलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या आवाहनाला नांदेडकरांनी कसून प्रयत्न केले. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये जीवित हानी बऱ्याच प्रमाणात रोखता आली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये नांदेड शहरातील सर्वच खासगी व सरकारी रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली होती. रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले होते. तसेच ऑक्सिजन पुरवठाही वेळेवर होत नसल्याने सर्वच जण हैराण झाले होते.
त्यानंतर तिसऱ्या लाटेत रुग्णांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे व शहरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मालेगाव रोडवरील तरोडा खुर्द परिसरातील भक्ती लॉन्स या ठिकाणी नव्याने कोविड केअर सेंटर निर्माण केले होते.
अर्ध्या नांदेडच्या रुग्णांसाठी हे कोवीड सेंटर तयार झाले होते. कोरोनाच्या दुसर्या लाटेत या सेंटरमध्ये काही रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर परत दोन महिन्यापूर्वी तिसरी लाट उसळल्याने नांदेडची रुग्ण संख्याही सहाशे, सातशे पेक्षाही अधिक येत होती. मात्र आता ती नियंत्रणात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अखेर मंगळवार दि. 8 फेब्रुवारीपासून भक्ती लॉन्स येथील सेंटर बंद करण्यात आले आहे. तेथील सामानाची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻