ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे तांडव झाल्यानंतर सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. यातच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी काल मंगळवार दि. 3 ऑक्टोबर रोजी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांच्या हातात झाडू देऊन त्यांना चक्क शौचालय साफ करण्यास लावले. यावेळी त्यांनी स्वतःही पाण्याने सफाई केली, मात्र या प्रकारावर विविध वैद्यकीय आणि डॉक्टर्स संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेर डीन डॉक्टर वाकोडे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातमी 👇🏻
नांदेड शहराच्या विष्णुपुरी भागात असलेल्या शासकीय रुग्णालयात गांधी जयंती दिनी 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा 11 रुग्ण पून्हा मरण पावले. जवळपास 35 रुग्ण मृत्युमुखी पडले असल्याने जिल्ह्यासह राज्यात व देशात खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना रुग्णालयास भेट देण्यास पाठवले होते. त्यापूर्वी शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनीही रुग्णालयात भेट दिली.
यावेळी संतप्त झालेल्या खा. हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील शौचालय साफ करण्यासाठी अधिष्ठाता डॉक्टर शामकांत वाकोडे आणि बालरोग विभागप्रमुख यांच्या हातात झाडू देऊन शौचालय साफ करण्यास लावले. या घटनेमुळे सबंध वैद्यकीय शिक्षण विभागात नाराजीचा सूर उमटला. हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याची संतप्त प्रतिक्रिया रुग्णालय कर्मचारी व डॉक्टरांकडून व्यक्त झाल्या. अखेर काल दि.3 ऑक्टोबरच्या रात्री डॉ. शामकांत वाकोडे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) सुशीलकुमार नायक करत आहेत. यावरून खासदार हेमंत पाटील आणि डीन-प्रशासन असा वाद चांगलाच पेटल्याची चिन्ह दिसून येत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻