ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ बाळ आणि बाळंतीणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल
नांदेड- खासदार हेमंत पाटील यांच्यापाठोपाठ मेडीकल कॉलेजच्या डीन विरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांच्यासह दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कंधार तालुक्यातील एक बाळ आणि बाळंतीणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील कै. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या मृत्यूचे तांडव सुरूच आहे. तीन दिवसांत 41 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात 22 नवजात बालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बुधवारी पहाटे कंधार तालुक्यातील कुरुळा येथील एका बाळंत मातेचा व तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिष्ठाता डॉक्टर एस. आर. वाकोडे आणि बालरोग विभागाच्या डॉक्टरविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडच्या विष्णुपुरी भागात असलेल्या कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात एक ऑक्टोबरपासून ते तीन ऑक्टोबरच्या दरम्यान एकेचाळीस रुग्णांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. त्यामध्ये 22 नवजात बालकांचा समावेश आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आमदार व इतर लोकप्रतिनिधी, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी मनुष्यबळाचा अभावासह हलगर्जीपणा, औषधींचा तुटवडा आणि अस्वच्छतेचे कारण समोर स्पष्ट दिसत होते. खासदार हेमंत पाटील यांनी डॉक्टर एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करण्यास लावल्यानंतर हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टसह शासकीय कामात अडथळा आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला . विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील खासदार हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचेही कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांना निवेदन देऊन डॉक्टर वाकोडे यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली होती.
त्यातच बुधवारी पहाटे कुरुळा तालुका कंधार येथील एका बाळांत मातेचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चिघळले. मयत महिलेचे नातेवाईक कामाजी टोम्पे यांच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री डॉक्टर एस. आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट देणार आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻