ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

🟠 नांदेड जिल्ह्याच्या विकासाची भूक भागविण्यासाठी भाजपत- खासदार अशोकराव चव्हाण

नांदेड – भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवडीनंतर पहिल्यांदाच शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात दाखल झाले. त्यांचे नांदेडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. अशोकराव चव्हाण दुपारी अडीच वाजता विमानाने श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावर दाखल झाले. खासदार डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर तेही शुक्रवारी सकाळी मुंबईवरून पहिल्यांदाच नांदेडमध्ये आले, रेल्वे स्थानकावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
खा. चव्हाण यांच्या स्वागतासाठी विमातळापासून ते शिवाजीनगरपर्यत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.विमानतळापासून उघड्या जीपमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. विमानतळ, सांगवी, कामगार पुतळा, चैतन्यनगर, राज कॉर्नर, वर्कशॉप, श्रीनगर, आटीआय महात्मा फुले पुतळा, कुसुमताई चौक येथून शिवाजीनगर त्यांच्या निवासस्थानापर्यंत कार्यकत्यांनी दोन्ही बाजूने गर्दी करून खा. चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या व स्वागत केले. श्रीनगर, कुसुमताई चौक, आयटीआय चौकात महात्मा फुले पुतळ्यासमोर प्रत्येकी दोन क्विंटलचा पुष्पहार क्रेनद्वारे त्यांना घालण्यात आला.
दरम्यान, कलामंदिरपासून राज कॉर्नरपर्यंत दोन्ही बाजूने वाहतूक बंद करून मिरवणुकीतून येणाऱ्या वाहनांना अडथळा होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली. शहरातील मुख्य रस्त्यावर अशोकराव चव्हाण यांच्या स्वागताचे कटआउट तसेच दुभाजकावर भाजपाचे ध्वज फडकत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, रमेश वाघ, सूर्यमोहन बोलमवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे जोरदार स्वागत
राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे हेही नांदेडला शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी आले. हजूर साहेब रेल्वे स्थानकावर त्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केल्यानंतर रॅलीद्वारे त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.
खा. अजित गोपछडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी मुंबईवरून पहिल्यांदाच नांदेडच्या रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे रेल्वेस्थानक परिसरात जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर त्यांचे मूळ गाव असलेले बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव येथे त्यांच्या भव्य स्वागताची तयारी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारनंतर ते रवाना झाले. यावेळी भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, डॉ. संतुकराव हंबर्डे, किशोर देशमुख, प्रवीण साले, आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यासह भाजपतील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारनंतर त्यांचे मूळ गाव बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. त्यासाठी ते नांदेड शहरातील चाहत्यांचा सत्कार स्वीकारून बिलोलीकडे रवाना झाले होते.
नांदेड जिल्ह्याच्या विकासाची भूक भागविण्यासाठी भाजपत- खासदार अशोकराव चव्हाण
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेचे खासदार करण्यात आले. भाजपत गेल्यानंतर पहिल्यांदाच ते नांदेडात आले असता त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आपल्या निवासस्थानासमोर आयोजित कार्यक्रमात अशोकराव चव्हाण बोलताना म्हणाले की, मराठवाडा व नांदेडच्या विकासाची भूक भागविण्यासाठी मी भाजपात गेलो आहे. विकसित भारत करण्यासाठी मला आपली सर्वांची साथ हवी, सर्व मिळून आपल्या जिल्ह्याचा विकास करू असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
खासदार अशोकराव चव्हाण राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ते मुंबईहून विशेष विमानाने नांदेडच्या गुरुगोविंद सिंग विमानतळावर दुपारी पोहोंचले. विमानतळावर त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. सर्वप्रथम सांगवी येथील त्यांच्या चाहत्यांनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. तेथून त्यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढत जागोजागी कार्यकर्त्यांनी सत्कार केला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक सायंकाळी पाच वाजता त्यांच्या शिवाजीनगरस्थित असलेल्या निवासस्थानी पोहोचली. यावेळी आयोजित कार्यक्रमात अशोकराव चव्हाण बोलत होते.
यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, डॉ. तुषार राठोड, भाजपाचे शहर महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, दक्षिणचे डॉ संतोष हंबर्डे, डॉ . मीनलताई खतगावकर, देविदास राठोड, माजी आमदार अविनाश घाटे, प्रवीण साले, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, किशोर स्वामी, संजय देशमुख लहानकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की, विमानतळ ते माझे घर एवढ्या अंतरात माझे कार्यकर्त्यांनी केलेले स्वागत मी कदापी विसरणार नाही. 12 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत बारा दिवसाच्या कालावधीत जो बदल घडला तो या स्वागतावरून लक्षात येते. लवकरच मी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. एवढेच नाही तर उद्या भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या सूचना ऐकणार आहे. विशेष म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेड मार्गे यवतमाळ जात असल्याने त्यांचे स्वागत करण्याची संधी मला या निमित्ताने मिळत आहे. काँग्रेस पक्षात असताना मी प्रामाणिकपणे काम केले परंतु पक्ष सोडल्यानंतर लगेच माझ्यावर पक्षाकडून टीका झाली याकडे मी लक्ष देत नाही. निर्णय घेऊन पक्ष सोडला असे चव्हाण म्हणाले.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून मला खासदारकी दिली, त्यामुळे माझी जबाबदारी आता वाढली आहे. बारा दिवसात आमदाराचा खासदार झालो असे ते म्हणाले. विकसित भारताची घोषणा म्हणून मी मनाची गाठ बांधली आणि भारत महाराष्ट्र आणि नांदेड विकासाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने मी पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठवाडा आणि नांदेडच्या विकासाची भूक पूर्ण करायची आहे. मी सत्तेत असताना नेहमीच नांदेडला झुकते माप दिले आहे. माझी विकासाच्या दृष्टीने प्रामाणिक भूमिका आहे आणि येणारी पुढची सत्ता ही भारतीय जनता पार्टीची असल्याने तुम्हा सर्वांची साथ मला येणाऱ्या काळात लागणार आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख करत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका करण्यामागे त्यांचा महत्त्वाची भूमिका होती आणि ते नेहमी विरोधकांनाही सन्मानाची वागणूक देत होते. आपल्या भागाचा आणि सर्व सोबतच्या कार्यकर्त्यांचा विकास करण्यासाठी आगामी निवडणुका कुठलाही भेदभाव न करता समन्वय साधून काम करू, यासाठी तुमच्या एकजुटीची मला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे, आमदार राम पाटील रातोळीकर, डॉ. तुषार राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार अमर राजूरकर, सूत्रसंचालन प्रवीण साले तर आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात शांतीपाठ आणि आशीर्वाद वचन व चारही वेदोपचाराने ब्रह्मवृंदांनी केले . यावेळी सतीश गुरु पोद्दार, रवींद्र गुरु गौरकर, गिरीश पुजारी, मकरंद घाटोड, विनायक गुरु यांच्यासह 125 ब्रह्मवृंदांनी वेदोपचाराने सुरुवात केली. यावेळी माजी आमदार अमिताताई चव्हाण यांचीही उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
