ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/कुंडलवाडी- जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातीलकुंडलवाडी येथून बेपत्ता झालेल्या मजूर पिता- पुत्रापैकी पित्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पाच जणांनी त्यांचा खून करून प्रेत पुरले होते. ते प्रेत पोलिसांनी बाहेर काढले असून बेपत्ता मुलाचा शोध सुरु आहे.
कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुनगंदा शिवारात दि.२१ फेब्रुवारी रोजी परराज्यातुन हरभरा काढण्यासाठी आलेल्या दोन मजूर गटात रात्रीला जेवणावरुन व मजुरीच्या पैशाच्या कारणावरून वाद घडला. यातून राजस्थानच्या पिता- पुत्राचे अपहरण करण्यात आले. कुंडलवाडी पोलिसांनी कसुन तपास केल्याने सोमवारी दि. एक मार्च रोजी पित्याचा दफन केलेला मृतदेह पोलिसांना सापडला. बेपत्ता मुलाचा शोध सुरु आहे.
कुंडलवाडी शिवारात सध्या स्थितीत हरभरा काढण्याचा हंगामा चालु असून राज्यासह परराज्यातील मळणी यंत्रधारक या परिसरात मोठ्या संख्येने आले आहेत. दि. २१ फेब्रुवारी रोजी आरोपी प्रमोद रमेश, बंटी निझाम सलामे, विनोद चुनु सलामे व दोन विधीसंघर्ष बालक सर्व राहणार पलासपाणी ता. भिमपुरा जि. बैतूल मध्यप्रदेश व मयत रशीद खाँ हसना वय (४५) आणि त्यांचा मुलगा अमजद खाँ रशीद खाँ (वय १७) यांच्यात रात्रीच्या जेवणावरुन व मजुरीच्या पैशाच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर दि.२६ फेब्रुवारी रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात पिता- पुत्राचे अपहरण झालाची तक्रार रुदार खाँ झडमल खाँ राहणार भैंसरावत ता. गोविंदगड जि. अलवर राजस्थान यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात दिली. दि.२७ रोजी चौकशीअंती अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सदर गुन्हाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक करिम पठाण यांनी सुरु केला.
दोन दिवसाच्या कालावधीत आरोपींची चौकशी केली असता त्यांनी रशिद खान (वय ४५) यास ठार मारुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरुन टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर कुंडलवाडी ते शेळगाव मार्गावर मयत रशीद खाँ यास दफन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यातील बेपत्ता अमजद खाँ रशीद खाँ याचा शोध सुरु आहे. सर्व मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आहेत. बेपत्ता मुलाचा शोध लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण, पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी हे प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा तपास धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻